गरज पडल्यास राज ठाकरेंना पुन्हा चौकशीसाठी बोलविणार; असा होता आजचा घटनाक्रम!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 08:45 PM2019-08-22T20:45:10+5:302019-08-22T21:06:17+5:30
राज ठाकरेंची गुरुवारी ईडी चौकशी होणार या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली होती
मुंबई - कोहिनूर मिल गैरव्यवहार प्रकरणावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची गुरुवारी ईडीने तब्बल साडेआठ तास चौकशी केली. सकाळी 11.30 वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांकडून ही चौकशी सुरु झाली होती. राज ठाकरेंनी ईडीच्या चौकशीला पूर्णपणे सहकार्य केल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. तर चौकशीनंतर रात्री 8.15 च्या सुमारास राज ठाकरे ईडीच्या कार्यालयाबाहेर पडले. त्यानंतर कुटुंबासह राज ठाकरे कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी रवाना झाले.
राज ठाकरेंची गुरुवारी ईडी चौकशी होणार या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली होती. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. मनसेचे अनेक महत्वाचे कार्यकर्ते, नेते यांना पोलिसांनी सकाळीच अटक केली. त्याचसोबत ईडी कार्यालयाबाहेर प्रचंड प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला. ईडी कार्यालयाकडे जाणाऱ्या परिसरात कलम 144 लागू करण्यात आला होता. राज ठाकरे सकाळी 10.30 च्या सुमारास ईडी कार्यालयात येण्यासाठी कृष्णकुंजमधून निघाले, त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबसोबत होते. यात पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे, मुलगी उर्वशी ठाकरे आणि सून मिताली ठाकरेही उपस्थित होत्या.
कोहिनूर मिल आर्थिक गैरव्यवहार प्रकरण: राज ठाकरेंची ईडीने केली साडेआठ तास चौकशी https://t.co/OH1vOdDIsw
— Lokmat (@MiLOKMAT) August 22, 2019
सकाळपासून राज ठाकरेंचे कुटुंब हे ईडी कार्यालयाबाहेर उपस्थित होतं. ईडीच्या चौकशीसाठी गेलेल्या राज यांना एकट्याला कार्यालयात प्रवेश देण्यात आला. त्यांच्यासोबत असलेल्या सर्वांना कार्यालयाबाहेर ठेवण्यात आलं. कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दिड हजार पोलीस परिसरात तैनात करण्यात आले होते. ईडीच्या चौकशीमध्ये राज ठाकरेंनी ईडीच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नाला उत्तरे दिली.
तब्बल साडेआठ तास राज ठाकरेंची कसून चौकशी झाली. राज ठाकरेंना उद्या चौकशीसाठी बोलविण्यात येणार नाही. मात्र गरज भासल्यास पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलविण्यात येईल अशी माहिती मिळत आहे. तपास यंत्रणांच्या प्रक्रियेनुसार राज ठाकरे, उन्मेश जोशी आणि राजन शिरोडकर यांची एकत्रित चौकशीदेखील पुढील काळात करू शकतात. मात्र आज झालेल्या चौकशीत ईडीला सर्व प्रश्नांची उत्तरं राज ठाकरेंनी दिल्याचं सांगण्यात येत आहे.