Join us  

राज ठाकरे पुन्हा स्वबळावर लढणार; फायदा कोणाला? महायुतीला की महाविकास आघाडीला?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 6:16 AM

काही वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी स्वत: विधानसभा निवडणूक लढण्याची आधी घोषणा केली; पण नंतर त्यांनी निर्णय फिरविला होता.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत २५० जागा लढण्याची राज ठाकरे यांची घोषणा त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी किती मदतगार ठरेल, त्यांच्या या निर्णयाने महायुतीला फायदा होईल की महाविकास आघाडीला याची चर्चा आता नक्कीच होईल.

मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या पट्ट्यात राज यांना मानणारा वर्ग आहे. महाविकास आघाडी व महायुतीच्या जागावाटपात संधी न मिळालेले काही इच्छुक मनसेच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. कधी भाजपला पाठिंबा देत तर कधी काँग्रेस-राष्ट्रवादीला पूरक ठरेल अशी भूमिका घेत स्वबळ विसरलेले राज ठाकरे यांनी आता पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी ‘लावा रे तो व्हिडीओ’ म्हणत त्यांनी मोठ्या जाहीरसभा घेतल्या आणि तत्कालीन मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. त्यावेळी ते काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधले गेल्याची टीका झाली होती. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींना पंतप्रधान करण्यासाठी ते भाजप व महायुतीच्या पाठीशी उभे राहिले. त्यांनी स्वत:चे उमेदवार उभे केले नाहीत. नारायण राणेंसह महायुतीच्या काही उमेदवारांसाठी त्यांनी प्रचारसभाही घेतल्या होत्या.

तेव्हा एकच आमदार

काही वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी स्वत: विधानसभा निवडणूक लढण्याची आधी घोषणा केली; पण नंतर त्यांनी निर्णय फिरविला होता. २०१९ मध्ये मनसेने विधानसभा निवडणूक लढविली; पण त्यांचे केवळ एकच आमदार (राजू पाटील) निवडून गेले होते. 

टॅग्स :राज ठाकरेमनसेमहाराष्ट्र विकास आघाडीमहायुतीमहाविकास आघाडी