मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना निवडणूक आयोगाने खर्च सादर करण्याचे बजावले आहे. भाजपाने निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीची दखल घेत, निवडणूक आयोगाने ही बाब स्पष्ट केली आहे. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारार्थ राज यांनी घेतलेल्या 10 सभांचा खर्च त्यांना निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागेल, असे राज्याचे अतिरिक्त निवडणूक अधिकारी दिलीप गांधी यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे यांनी निवडणुकीत उमेदवार दिले नाही, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात जोरदार प्रचार केला. राज यांच्या सभा केवळ महाराष्ट्रात नाही, तर सोशल मीडियातून देशभर चर्चेचा विषय बनल्या. आपल्या सभांमध्ये मोदी यांनी सत्तेवर येण्यापूर्वी केलेली विधाने आणि नंतर केलेली विधाने याचे व्हिडीओ देतानाच डिजिटल व्हिलेजमधील स्टिंग ऑपरेशन लक्षवेधी ठरले. राज ठाकरेंचा ए लाव रे तो व्हिडीओ हा डॉयलॉग या संभांना एका वेगळ्याच प्रसिद्धीवर घेऊन गेला. राज यांनी अन्य काही विषयांबाबतचे पुरावेही थेट सभेत मांडल्याने भाजपची अडचण झाली. त्याला उत्तर देणे अवघड होत असल्याने थेट राज ठाकरेंवर टीका करण्यात आली. तर राज यांना सुपारीवाला नेताही म्हटले गेले.
भाजपा नेत्यांनी राज यांच्या सभांची धास्ती घेत निवडणूक आयोगाकडे त्यासंदर्भात तक्रारही दिली होती. राज हे निवडणूक लढवित नसून त्यांच्या सभांच्या खर्चाचा तपशील घ्यावा, असे पत्रच भाजपाने निवडणूक आयोगाला दिले होते. आयोगानेही भाजपाच्या तक्रारीची दखल घेत, राज यांना खर्चासंदर्भात माहिती द्यावी लागेल, असे म्हटले आहे. त्यामुळे राज आपल्या सभांचा खर्च कोणत्या उमेदवाराच्या नावावर दाखवणार हा खरा प्रश्न आहे.