मुंबई : महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्याचं किंवा शहराचं नाव घ्या, सर्वात आधी आठवते तिथली मिसळ. मग ती कोल्हापूरची लालभडक-झणझणीत मिसळ असेल, नाशिकची काळ्या मसाल्याची मिसळ असेल किंवा पुण्याची बटाट्याची भाजी घालून केलेली मिसळ असेल, मिसळ म्हटलं की मराठी माणसाच्या तोंडाला पाणी सुटणारच. अशा या महाराष्ट्रातल्या सर्व 'एक नंबरी' म्हणजे सर्वोत्कृष्ट मिसळी तुम्हाला एकाच ठिकाणी मिळाल्या तर? कित्ती मजा येईल !
अशी एक आगळीवेगळी संधी महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मिसळप्रेमी मुंबईकरांना उपलब्ध करुन दिली आहे. शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस माटुंगा पश्चिम येथील मोगल लेन येथे तीन दिवसांच्या शानदार अशा 'मनसे मिसळ महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, टीवी व सिने-नाट्सृष्टीतील ख्यातनाम कलावंतांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता या महोत्सवाचे उदघाटन होणार आहे. 'मनसे मिसळ महोत्सवा'विषयी माहिती देताना मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितले की, "महाराष्ट्रातील विविध भागांतील मिसळची चव मुंबईकरांना एकाच ठिकाणी अनुभवता यावी, यासाठी या मिसळ महोत्सवाचे आयोजन आम्ही केले आहे. या महोत्सवात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापूर, अहमदनगर,संगमेश्वर अशा विविध ठिकाणच्या सुप्रसिद्ध मिसळींवर ताव मारण्याची संधी मुंबईकरांना मिळेल."
"अहमदनगरची मारोतराव मिसळ, नाशिकची माऊली मिसळ, कोल्हापूरची अभिची मिसळ, संगमेश्वरची मुळ्येंची मिसळ, साता-याची इनामदार मिसळ, ठाण्यातील मामलेदार मिसळ, अशा अनेक ठिकाणच्या ख्यातनाम मिसळींचे मालक व त्यांची टीम या मनसे मिसळ महोत्सवात सहभागी होऊन मुंबईकर खवय्यांना मिसळींमधील विविधतेचं चविष्ट दर्शन घडवतील", असं नितीन सरदेसाई यांनी सांगितलं. शनिवार व रविवार हे दोन्ही दिवस खवय्यांना सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत चमचमीत, झणझणीत आणि तर्रीदार मिसळींचा आस्वाद घेता येईल, असंही नितीन सरदेसाई यांनी सांगितलं.