राज ठाकरे आज घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; 'टोल'धाडीचा निकाल लागणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 10:01 AM2023-10-12T10:01:23+5:302023-10-12T10:26:46+5:30
राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या आजच्या बैठकीनंतरच मनसेची टोलबाबतची पुढील भूमिका समोर येईल.
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यातील टोलनाक्यावरील मनसेचे आंदोलन चर्चेत आहे. मुलुंड-ठाणे टोलचे दर वाढल्याने मनसेचे अविनाश जाधव यांनी आमरण उपोषण सुरु केले होते. परंतु ४ दिवसांनी राज ठाकरेंनी स्वत: अविनाश जाधवांची भेट घेत उपोषण आपलं काम नसून याप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असं आश्वासन दिले होते. त्यानंतर आज राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांची भेट होणार आहे.
राज ठाकरे दुपारी ४ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेणार आहेत. या भेटीत विविध प्रश्नावर चर्चा होणार असून त्यात प्रामुख्याने टोलविषयी चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीत ते राज ठाकरेंना काय आश्वासन देतात हे पाहणे गरजेचे आहे. कारण राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीपर्यंत सरकारला अल्टीमेटम दिला होता. टोलबाबत सरकारची भूमिका काय यावर आजच्या बैठकीत चर्चा होईल. त्यातील माहिती राज ठाकरे स्वत: माध्यमांना देतील. जर यात सरकारकडून सकारात्मक पाऊल उचलले नाहीतर राज ठाकरेंच्या आदेशाप्रमाणे मनसे कार्यकर्ते टोलनाक्यावर उभे राहतील आणि वाहने सोडतील, जिथे वाहने सोडली जाणार नाहीत तिथे टोलनाके जाळू असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता.
राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या आजच्या बैठकीनंतरच मनसेची टोलबाबतची पुढील भूमिका समोर येईल. या बैठकीत टोलचा विषय महत्त्वाचा आहे परंतु त्याशिवाय इतरही विषयावर राज ठाकरे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे इतर विषय कोणते आहेत हेही पाहणे गरजेचे आहे.
राज ठाकरे काय म्हणाले होते?
मनसेने याआधी टोलविरोधात आंदोलन छेडल्यापासून प्रत्येक राजकीय पक्षाने टोलमुक्तीची घोषणा केल्याचे सांगत राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व नेत्यांच्या टोलमाफीचे व्हिडिओच दाखविले. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चित्रफिती होत्या. सगळ्यांनी टोलमुक्त महाराष्ट्र करू, अशी आश्वासने दिली. पण तरीही टोल बंद होत नाहीत. मधल्या काळात यांची सगळ्यांची सरकारे येऊन गेली पण आजपर्यंत टोल बंद झालेले नाहीत. राजकारणातल्या अनेक लोकांचे हे उदरनिर्वाहाचे साधन आहे. दर दिवसाला, आठवड्याला, महिन्याला यांच्याकडे यातून पैसे जात असतात. ते यामुळे टोल बंद करायला तयार नाहीत. तुम्हाला चांगले रस्ते मिळणार नाहीत. फक्त याच लोकांचा फायदा होणार आहे. या लोकांनी थापा मारल्यानंतरही पुन्हा त्याच पक्षाला मतदान होते हेच माझ्यासाठी अनाकलनीय आहे असं राज यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना फक्त कमर्शियल गाड्यांनाच टोल आकारणी होत असल्याचे विधान केले होते. त्यावर, हे धादांत खोटे असून जर टोलमुक्ती झाल्यानंतरही आपण टोल देत असू, तर हे पैसे जातायत कुठे, टोल हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा स्कॅम आहे. याबाबत मी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. त्यांचे काय उत्तर येते ते बघू. अन्यथा फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे संबंधित वाहनांना टोल लावू दिला जाणार नाही. पुढे महाराष्ट्र सरकारला काय करायचे ते करावे असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता.