Join us

राज ठाकरेंचं मराठी माणसांना आवाहन; “‘ही’ मुलं अत्यंत कष्टानं, संघर्ष करत पुढे आलेत...”

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2022 3:18 PM

डिमॉलिशन कू च्या मुलांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची दादर येथील शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली.

मुंबई – सोनी इंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ (India's Got Talent) या रिएलिटी शोनं कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या शोमध्ये स्पर्धक म्हणून असलेल्या ‘डिमॉलिशन क्रू’ हा डान्स ग्रुपनं त्यांच्या नृत्याविष्कारामुळे लोकांची मनं जिंकली आहेत. डिमॉलिशन क्रू(Demolition Crew) या ग्रुपनं आतापर्यंत जितके परफॉर्मन्स केलेत त्याने या शोचे जज शिल्पा शेट्टी, किरण खेर, मनोज मुंतशिर यांनी तोंडभरून कौतुक केले आहे. अनेकदा ‘डिमॉलिशन क्रू’ ग्रुपला स्टॅन्डिंग ओवेशनही मिळाला आहे.

मात्र आता या ग्रुपच्या डान्सचे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंही(MNS Raj Thackeray) चाहते झाले आहेत. डिमॉलिशन कू च्या मुलांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची दादर येथील शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर राज ठाकरेंनी ट्विट करत म्हटलंय की, सोनी वाहिनीवरच्या इंडियाज गॉट टॅलेंट या डान्स रिएलिटी शोमध्ये सहभागी झालेल्या डिमॉलिशन क्रू या ग्रुपच्या मुलांनी भेट घेतली. त्यांच्यासोबत छान गप्पा झाल्या. अंबरनाथ, बदलापूरच्या सर्वसामान्य घरांतून आलेली ही मुलं अत्यंत कष्टाने, संघर्ष करत पुढे आली आहेत असं त्यांनी सांगितले.

तसेच या मुलांचा जन्मच जणू नाचण्यासाठी झालाय, इतकं उत्कृष्ट ती नाचतात. डान्स शोच्या अंतिम फेरीत पोहोचून डिमॉलिशन क्रू ग्रुप विजयी ठरावा. यासाठी सर्व मराठी जनांनी त्यांना व्होट करावं हे माझं आग्रहाचं आवाहन असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सांगितले आहे. अलीकडेच या ग्रुपने इंडियाज गॉट टॅलेंट या शोमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्तानं स्पेशल नृत्य सादर केले. त्यात मुंबईची लाईफ लाइन असलेल्या डबेवाल्यांना समर्पित अ‍ॅक्ट केला. फटा पोस्टर निकला हिरो चित्रपटातील धतिंग नाच या गाण्यावर त्यांनी दमदार मूव्ह्ज केल्या.

टॅग्स :मनसेराज ठाकरे