Eknath Shinde ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत राजकीय नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छगन भुजबळांच्या मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात कसे बसलात, असा सवाल विचारत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर मी आता एकनाथ शिंदे यांच्याही मंत्रिमंडळात आहे, याची आठवण करून देत भुजबळ यांनी राज ठाकरेंना कोंडीत पडकलं. या सगळ्या वादंगावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भाष्य केलं आहे.
"बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न झाला. पण त्यानंतर बाळासाहेब आणि छगन भुजबळ हे मातोश्रीवर भेटले. तो सगळा आता इतिहास झाला आहे. बाळासाहेब मोठ्या मनाचे होते, त्यांनी भुजबळांना माफ केलं आहे," असं एकनाथ शिंदे यांनी 'झी २४ तास'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. त्यामुळे आधी राज ठाकरे यांना भुजबळांच्या सत्तेतील सहभागावरून केलेल्या टीकेनंतर आता मुख्यमंत्री शिंदे यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केल्याचं दिसत आहे.
नक्की काय आहे वाद?
ज्या छगन भुजबळ यांनी बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला, त्या भुजबळांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही सत्तेत कसे बसलात, असं म्हणत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला होता. त्यावर भुजबळ यांनी पलटवार करत म्हटलं की, "हा प्रश्न राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही विचारला पाहिजे की, ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे, असं तुम्ही म्हणता. मग तरीही तुम्ही भुजबळांच्या मांडीला मांडी लावून कसे काय बसला आहात? माझ्याबद्दल ही सगळी मंडळी बोलतात, पण मी तरी एक शिवसैनिक असेल, कदाचित फार कट्टर नाही, असंही समजून चला. अरे पण तुम्ही तर रक्ताचे आहात ना?" असा खोचक सवाल भुजबळांनी विचारला होता. पुढे बोलताना छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं की, "राज शाळेतून आला नाही, म्हणून अनेकदा मातोश्रीवरील लोक जेवत नव्हते. असं असताना तुम्ही का केलं असं बाळासाहेबांसोबत? तुम्ही तर इकडे पण असता तिकडे पण असता. चला जाऊद्या, माझ्यादृष्टीने हा मुद्दा संपला आहे, कारण लोकांनाही हा मुद्दा फारसा भावला, असं काही नाही. मी जसं उद्धव ठाकरे यांच्यासोबत बसलो होतो, तसं आता एकनाथ शिंदे यांच्याबरोबरही बसलो आहे," अशा शब्दांत भुजबळ यांनी आपली भूमिका मांडली.