मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त राज ठाकरे यांनी व्यंगचित्र साकारत पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर जहरी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'प्रजासत्ताक' फासावर लटकवल्याची बोचरी टीका राज यांनी व्यंगचित्रातून केली आहे.
व्यंगचित्राद्वारे बोचरी टीका
'स्वतंत्रते न बघवते', असे शीर्षक राज ठाकरे यांनी व्यंगचित्राला दिले आहे. पंतप्रधान मोदी 'प्रजासत्ताक' फासावर लटकवत आहेत आणि मोदींचे हात बळकट करा, असे म्हणत अमित शहा त्यांच्या भूमिकेला समर्थन देत असल्याचे व्यंगचित्रामध्ये दाखवण्यात आले आहे.
पण, या व्यंगचित्रामुळे नेटीझन्स राज ठाकरेंवर संतापले आहेत. काहींनी आपला संताप थेट व्यक्तदेखील केला आहे.
दरम्यान, राज ठाकरेंच्या या चित्राला आता भाजपा कोणत्या पद्धतीनं उत्तर देणार, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
यापूर्वी 19 जानेवारीला राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले होते. ''काँग्रेसने मोदींना छळले, म्हणून मोदी जनतेला छळतोय'', असा टोला राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून मोदींना लगावला होता. गुजरातचा मुख्यमंत्री असताना मला काँग्रेसने छळले होते, असे मोदींनी म्हटले होते. या विधानाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी हे व्यंगचित्र रेखाटले आहे. काँग्रेसने मला छळले, म्हणून मी जनतेला छळतो, असे या व्यंगचित्रात रेखाटले.
मकर संक्रांतीच्या दिवशीही राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी थापांचे पतंग उडवत असल्याचं व्यंगचित्र रेखाटलं होतं. अमित शहा, भक्त आणि काही मीडियासोबत मोदी पतंग उडवत होते. 10 टक्के सवर्ण आरक्षणाचा पतंग आकाशात उडत आहे आणि आधी दिलेल्या आश्वासनांचे पतंग गच्चीत पडले आहेत, असं व्यंगचित्र काढून राज यांनी आरक्षणाच्या निर्णयावरुन टोला लगावला होता.