Join us

हिंमत असेल तर भायखळ्यात येऊन तोडफोड करा, वारिस पठाण यांचं राज ठाकरेंना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2017 8:16 AM

'राज ठाकरेंची महाराष्ट्रातली सत्ता संपली आहे. त्यांचा एक आमदार होता, तोही त्यांच्यासोबत नाहीये.  महापालिकेत काहीच नाहीये. स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठीचा हा त्यांचा प्रयत्न आहे', अशी टीका वारिस पठाण यांनी केली आहे

ठळक मुद्दे'हिंमत असेल, तर भायखळ्यात येऊन तोडफोड करा, मग तुम्हाला दाखवतो'एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांचं राज ठाकरेंना आव्हानराज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा असल्याची टीका वारिस पठाण यांनी केली आहे

सोलापूर - अनधिकृत फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरुन मनसेने काँग्रेस ऑफिसची तोडफोड केल्यामुळे आधीच वातावरण पेटलं असताना आता एमआयएमने या वादात उडी घेतली आहे. हिंमत असेल, तर भायखळ्यात येऊन तोडफोड करा, मग तुम्हाला दाखवतो, असं आव्हानच एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी राज ठाकरेंना दिलं आहे. यावेळी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा असल्याची टीका वारिस पठाण यांनी केली आहे. वारिस पठाण ईद-ए-मिलाद निमित्त सोलापुरात आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. 

'राज ठाकरे बुझा हुआ दिया है. त्यांची महाराष्ट्रातली सत्ता संपली आहे. त्यांचा एक आमदार होता, तोही त्यांच्यासोबत नाहीये.  महापालिकेत काहीच नाहीये. स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठीचा हा त्यांचा प्रयत्न आहे', अशी टीका वारिस पठाण यांनी केली. 

'जर त्यांना वाटतं फेरीवाले चुकीच्या पद्धतीने बसत आहेत तर मग का नाही पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करत ?  पोलीस ऐकत नसेल तर न्यायालायत जावा. पण नाही  गरीब लोक जिथे बसतात तिथे जाऊन तोडफोड करतात. गरिबावर हल्ला करुन दाखवतात, आमच्या येथे भायखळ्यात येऊन तोडफोड करुन दाखवा', असं आव्हान; वारिस पठाण यांनी दिलं आहे. 

मनसेचे नेते संदीप देशपांडेंसह 8 जणांना पोलीस कोठडीफेरीवाल्यांच्या प्रश्नावरून काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सुरू झालेल्या राडेबाजीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ( 1 डिसेंबर ) मनसेच्या कार्यकर्त्यांनी आझाद मैदान येथील मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला करत तोडफोड केली. याप्रकरणी संदीप देशपांडे यांच्यासह मनसेच्या 8 जणांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  गुन्ह्यातील बांबू, लोखंडी रॉड आणि मोटारसायकल जप्त करायची असून तपास बाकी असल्याचे सांगत पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली. शनिवारी दुपारी 1 वाजता किल्ला कोर्ट 37 वे न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आर. एस. अराध्ये यांच्यासमोर हजर केले.  

नेमके काय आहे प्रकरण?फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सुरू झालेल्या राडेबाजीने आता उग्ररूप धारण केले आहे. विक्रोळी येथे मनसेच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आझाद मैदान येथील मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला करत तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी माजी नगरसेवक संदीप देशपांडेसह आठ मनसैनिकांना अटक केली आहे. सकाळी काँग्रेसचे कार्यालय उघडल्यानंतर काही मनसे कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयात घुसून तोडफोड केली.

अवघ्या काही सेकंदांत कार्यकर्ते तिथून पसार झाले. त्यानंतर संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी मनसेचे झेंडे व राज ठाकरे यांचे फोटो जाळले़ मनसेने केलेल्या या हल्ल्याचे वृत्त कळताच काँग्रेस नेत्यांनी घटनास्थळी धाव घेतली. काँग्रेसचे आजी-माजी आमदार, खासदार आणि पदाधिकारी मुंबई काँग्रेस कार्यालयाबाहेर जमा झाले. माजी खासदार गुरूदास कामत, एकनाथ गायकवाड, यांच्यासह आमदार भाई जगताप, माजी आमदार मधुकर चव्हाण, कृपाशंकर सिंह यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या हल्ल्याचा निषेध केला.

टॅग्स :वारिस पठाणराज ठाकरेमनसे