Join us

राज ठाकरेंच्या फटकेबाजीनंतर भाजपा बॅकफूटवर, हरिसाल गावातील तांत्रिक मुद्दे सोडविण्याचं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 12:56 PM

भाजपानं अमरावतीमधल्या हरिसाल गावाची जाहिरात केली होती. त्यामध्ये हरिसाल गाव डिजिटल झाल्याचं चित्र दाखवण्यात आलं होतं.

सोलापूर : भाजपाच्या तथाकथित डिजिटल गावाचं खरं रुप दाखवत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी सरकारच्या दाव्याची चिरफाड केली. भाजपानं हरिसाल गाव डिजिटल झाल्याचा दावा केला होता. मात्र, तो धादांत खोटा आहे, असं म्हणत राज यांनी हरिसाल गावाची सद्यस्थिती व्हिडीओसह उपस्थितांना दाखवली. त्यानंतर, भाजपा सरकारला खडबडून जाग आली आहे. हरिसाल गावातील जे तांत्रिक मुद्दे असतील, ते सोडवू असे शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी म्हटलं आहे.  

भाजपानं अमरावतीमधल्या हरिसाल गावाची जाहिरात केली होती. त्यामध्ये हरिसाल गाव डिजिटल झाल्याचं चित्र दाखवण्यात आलं होतं. गावात इंटरनेट असल्याचं, दुकानांवर डिजिटल पेमेंट होत असल्याचं भाजपानं जाहिरातीत दाखवलं होतं. मात्र हरिसाल गावातली खरी परिस्थिती वेगळीच असल्याचं मनसेनं दाखवलं. हरिसाल गावातल्या तरुणाला यावेळी राज यांनी मंचावर आणलं. 'हरिसाल गावाच्या जाहिरातीत दिसलेला हा तरुण सध्या सगळीकडे नोकरीसाठी भटकतोय. काही मनसे कार्यकर्त्यांना पुण्यात हा तरुण भेटला आणि त्यानंतर तो माझ्या संपर्कात आला,' असं राज यांनी सांगितलं.

राज ठाकरेंच्या या पोलखोल सभेनंतर भाजपा नेते आणि मंत्री विनोद तावडेंनी सराकरतर्फे आश्वासन दिले आहे. त्या, गावातील तांत्रिक मुद्दे सोडवले जाती, असे तावडे म्हणाले. तसेच भाजपाकडून काही व्हीडिओही शेअर करण्यात आले आहेत. त्यामध्ये राज ठाकरेंनी दाखवलेलं पूर्णत: खोट असून सत्यता वेगळीच असल्याचं म्हटलं आहे. 'सत्यता' या नावाने भाजपाने हे व्हीडिओ महाराष्ट्र सरकारद्वारे चित्रित केले आहेत. 

दरम्यान, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हरिसालबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी हरिसाल हे डिजिटल व्हिलेज असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं होतं. राज ठाकरे हरिसालला गेलेलेच नाहीत. तुम्ही तुमच्या लोकांना पाठवून तिथली परिस्थिती बघा, असंदेखील फडणवीस म्हणाले होते. मात्र त्या वृत्तवाहिनीलादेखील हरिसालमध्ये काहीच डिजिटल दिसलं नाही. यावरुनही राज यांनी मुख्यमंत्र्यावर सडकून टीका केली. 'राज ठाकरे हरिसालला गेलेच नाहीत असं मुख्यमंत्री म्हणाले. मग ते म्हणाले होते मी महाराष्ट्रात 2 लाख वीस हजार विहिरी बांधल्या. कुठल्या विहिरीवर तुम्ही पाणी काढायला गेला होतात?', असा सवाल राज यांनी विचारला.  

 

 

टॅग्स :राज ठाकरेविनोद तावडेमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019निवडणूकमनसेडिजिटल