जे सोशल मीडिया नावाचं अस्त्र भाजपाने वापरलं ते आता त्यांच्यावर बुमरँग झालंय, राज ठाकरेंची सणसणीत टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 02:02 PM2017-09-27T14:02:25+5:302017-09-27T14:07:46+5:30

भारतीय जनता पक्षाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जे पेरलं तेच आता उगवलंय. खोटी माहिती पसरवण्यासाठी, लोकांची मनं कलुषित करण्यासाठी जे सोशल मीडिया नावाचं अस्त्र भाजपने वापरलं ते आता त्यांच्यावर बुमरँग झालंय अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे. 

Raj Thackeray's criticism of the social media, which is now used by the Astrakhan | जे सोशल मीडिया नावाचं अस्त्र भाजपाने वापरलं ते आता त्यांच्यावर बुमरँग झालंय, राज ठाकरेंची सणसणीत टीका

जे सोशल मीडिया नावाचं अस्त्र भाजपाने वापरलं ते आता त्यांच्यावर बुमरँग झालंय, राज ठाकरेंची सणसणीत टीका

Next
ठळक मुद्देराज ठाकरे यांनी सोशल मीडियाचा वापर करुन सत्तेत आलेल्या भाजपाला दुटप्पी भूमिकेवरुन खडे बोल सुनावले आहेत'भारतीय जनता पक्षाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जे पेरलं तेच आता उगवलंय''खोटी माहिती पसरवण्यासाठी, लोकांची मनं कलुषित करण्यासाठी जे सोशल मीडिया नावाचं अस्त्र भाजपने वापरलं ते आता त्यांच्यावर बुमरँग झालंय'

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी सोशल मीडियाचा वापर करुन सत्तेत आलेल्या भाजपाला दुटप्पी भूमिकेवरुन खडे बोल सुनावले आहेत. भारतीय जनता पक्षाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जे पेरलं तेच आता उगवलंय. खोटी माहिती पसरवण्यासाठी, लोकांची मनं कलुषित करण्यासाठी जे सोशल मीडिया नावाचं अस्त्र भाजपने वापरलं ते आता त्यांच्यावर बुमरँग झालंय अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे. 

फेसबुकवर सक्रीय झाल्यापासून राज ठाकरे बेधडकपणे आपली मतं मांडत असून सरकारवर प्रहार करत आहेत. यावेळी राज ठाकरेंनी एक सविस्तर पोस्ट टाकत सोशल मीडियापासून ते नोटाबंदीपर्यंतच्या निर्णयावर टीका केली आहे. 

निवडणूका जिंकण्यासाठी वाट्टेल ती आश्वासनं दिली, लोकांची मनं भडकवण्यासाठी खोट्याचं खरं करून दाखवलं, आणि जे याला विरोध करत होते त्यांना 'ट्रोल्स' च्या माध्यमातून शिवीगाळ केली, त्यांचं खच्चीकरण केलं. हे सगळं करून सत्तेवर आल्यावर,नीट काम केली असतीत, दिलेली आश्वासनं पूर्ण केली असतीत तर एक वेळ लोकांनी दुर्लक्ष केलं असतं. पण आश्वासनं पूर्ण करणं सोडा, तुम्ही सत्तेच्या मग्रूरीत निवडणुकीच्या काळांत दिलेली आश्वासनं हा निवडणुका जिंकण्यासाठी केलेला 'जुमला' होता असं निर्लज्जपणे जाहीर केलंत असं राज ठाकरे बोलले आहेत. 

तुम्ही केलेल्या नोटबंदीने अर्थव्यवस्था डबघाईला गेली, लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या, महागाईने कळस गाठलाय आणि एवढं होऊन देखील लोकांनी तुम्हाला जाब विचारायचा नाही? पंतप्रधान स्वतःला प्रधान सेवक म्हणवतात आणि जनतेला राजा, मग राजाने सेवकाला कामचुकारीबद्दल प्रश्न विचाराचे नाहीत? आणि सोशल मीडियावर जाब विचारला म्हणून तुम्ही नागरिकांना पोलिसांकरवी नोटिसा धाडणार? पंतप्रधानांच्या फसलेल्या योजनांविषयी लिहिलं, त्यामुळे कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल आणि पोलिसांना जर धडाधड नोटिसा पाठवायला लावणार असाल तर मग तुम्ही पोसलेल्या लाखो 'ट्रोल्सचं' काय? असा सवाल राज ठाकरेंनी विचारला आहे. 

फोटोशॉपचा वापर करून नव्हत्याच, होतं केलंत. तुम्हाला विरोध करणाऱ्या पत्रकारांबद्दल, विचारवंतांबद्दल भारतीय जनता पक्षाच्या आयटी आणि सोशल मीडियाकरवी इतकं गलिच्छ लिहिलं गेलं की ते वाचून मरू दे तो सोशल मीडिया असं वाटावं. तेंव्हा नाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला? दुसऱ्या राजकीय पक्षांची,त्यांच्या नेत्यांची थट्टा करताना तुम्हाला आनंद मिळत होता पण तुमची थट्टा व्हायला लागल्यावर तुम्ही पोलिसी बळाचा वापर करणार? असाही प्रश्न राज ठाकरेंनी भाजपाला विचारला आहे. 

या भस्मासुरांना तुम्ही पोसलंत, त्यांच्या बरोबर पंतप्रधान सेल्फी घेतात, त्यांना ट्विटरवर फॉलो करतात याचा अर्थ अराजक पसरावणाऱ्यांना तुम्ही पाठीशी घालताय. आणि तुमच्या नाकर्तेपणावर ताशेरे ओढणाऱ्यांवर पोलिसी बळाचा वापर करून दहशत बसवताय हा प्रकार आम्ही कदापि खपवून घेणार नाही असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. 

ज्यांना ज्यांना अश्या नोटिसा सरकारने धाडल्या असतील किंवा धाडल्या जातील त्यांनी माझ्याशी connectrajthackeray@gmail.com या माझ्या ईमेल आयडीवर संपर्क साधा,तुमचं नाव,पत्ता,पोलीस स्टेशनचं नाव संपर्क क्रमांक कळवा. पुढे पाहू काय करायचं ते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्याच नाही तरी कोणाही सामान्य माणसाला जरी अशी नोटीस आली तरी मला कळवा असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे. 

अजून एक बाब, मी पहिल्यापासून पोलिसांच्या पाठीशी ठाम उभा होतो,आहे आणि राहणार. माझी पोलीस बांधवाना विनंती आहे की तुम्ही सरकारच्या दडपणाखाली असल्या गोष्टी करू नका, सरकार बदलत राहतात, सरकारच्या सांगण्यावरून असल्या चुकीच्या गोष्टी करू नका असं आवाहन राज ठाकरेंनी पोलिसांना केलं आहे. 
 

Web Title: Raj Thackeray's criticism of the social media, which is now used by the Astrakhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.