राज ठाकरेंचं 'ते' विधान मुंबईकरांचा अपमान करणारं; NCP म्हणाली, माफी मागा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 07:19 PM2023-01-25T19:19:13+5:302023-01-25T19:20:00+5:30

राष्ट्रवादीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज ठाकरेंवरही निशाणा साधला.

Raj Thackeray's Dancebar statement will insult Mumbaikars; should be Apologize, NCP Mahesh Tapase said | राज ठाकरेंचं 'ते' विधान मुंबईकरांचा अपमान करणारं; NCP म्हणाली, माफी मागा

राज ठाकरेंचं 'ते' विधान मुंबईकरांचा अपमान करणारं; NCP म्हणाली, माफी मागा

googlenewsNext

मुंबई - मुंबईत विद्युत खांबावर लावण्यात आलेली रोषणाई राज ठाकरे यांना डान्सबारसारखी दिसत असेल तर ही शोकांतिका आहे. मुंबईकरांचा अपमान करणार्‍या मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जनतेची व मुंबईकरांची माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. राज ठाकरेंनी मुंबईच्या विद्युत रोषणाईवर टीका केली होती. त्याचा समाचार राष्ट्रवादीने घेतला. 

राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे म्हणाले की, मुंबईला 'डान्सबार'ची उपमा देऊन राज ठाकरेंनी मुंबईकरांचा अपमान केलाय. मुंबई डान्सबारसारखी दिसते बोलणार्‍या राज ठाकरे यांना बेस्टने वीज दरात १८ टक्के केलेली वाढ दिसली नाही किंवा ते त्यावर बोलले नाहीत. त्यावर बोलले असते तर नक्कीच आनंद झाला असता असं सांगत मुंबईला डान्सबारची उपमा देऊन राज ठाकरे यांनी मुंबईकरांचा अपमान केला आहे असं त्यांनी सांगितले. 

राज्यपालांनी खुलासा करावा
सत्ता स्थापनेसाठी लेखी निमंत्रण दिलेले नाही हे माहिती अधिकारात उघड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करण्याऐवजी राज्यपालांनी खुलासा करायला हवा अशी मागणी राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना सत्ता स्थापनेसाठी निमंत्रणच दिले नसल्याचे समोर आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी थातूरमातूर उत्तर दिले आहे. त्याला राष्ट्रवादीनं प्रत्युत्तर दिले. 

माहिती कार्यकर्ता संतोष जाधव याला राज्यपाल सचिव कार्यालयाने माहितीच्या अधिकारात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी दिलेल्या पत्राचा जावक क्रमांकाची नोंद जावक नोंदवहीमध्ये दिसून येत नाही. सबब सदर माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे उत्तर दिले आहे. एखाद्या नेत्याला आपल्याकडे संख्याबळ आहे ते सिध्द करण्यासाठी तसे पत्र राज्यपालांना द्यावे लागते. त्या संख्याबळाची खातरजमा केल्यानंतर सत्ता स्थापन करण्यासाठी लेखी स्वरूपात निमंत्रण राज्यपाल देतात मात्र हेच निमंत्रण पत्र राजभवन कार्यालयात उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे निमंत्रण नसताना सरकार कसे स्थापन केले व शपथविधी कसा झाला असा सवालही महेश तपासे यांनी उपस्थित केला आहे.

देवेंद्र फडणवीसांचा आरोप हास्यास्पद
जेलमध्ये टाकण्याचा कट महाविकास आघाडीने केला होता हा देवेंद्र फडणवीस यांचा आरोप हास्यास्पद आहे. मुळात भाजपने देशपातळीवरच्या व राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांना ईडी, सीबीआय या यंत्रणांचा दुरुपयोग करून जेलमध्ये टाकण्याचा सपाटा लावला आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा आरोप चुकीचा आहे. भाजपने ईडी या यंत्रणेचा इतका दुरुपयोग केला की काल झवेरी बाजारमध्ये ईडीच्या तोतया अधिकार्‍यांनी धाड टाकल्याचे समोर आले. म्हणजे देशाची नामांकित संस्था बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे असा आरोपही राष्ट्रवादीने केला. 
 

Web Title: Raj Thackeray's Dancebar statement will insult Mumbaikars; should be Apologize, NCP Mahesh Tapase said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.