मुंबई : येथे लोक किड्यामुंग्यांसारखी मरत असताना त्यांना सोयी न देता कसली बुलेट ट्रेन आणता? बुलेट ट्रेनची एक वीटही मुंबईत रचू देणार नाही, ती ट्रेन तुमच्या गुजरातेतच न्या, असे थेट आव्हान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. अपघाताविरोधात संताप व्यक्त करण्यासाठी ५ आॅक्टोबरला चर्चगेट स्टेशनवर मोर्चा नेला जाईल. मी सुद्धा त्यात असेन, असेही राज म्हणाले.मोदी आणि काँग्रेसच्या सरकारमध्ये काय फरक आहे, असा सवाल त्यांनी केला. मुंबईत बुलेट ट्रेन बळजबरीने करायचा प्रयत्न केल्यास त्याला प्रत्युत्तर दिलेजाईल. आहेत त्या गोष्टी नीट ठेवण्याचे नियोजन होत नाहीत आणि नवीन गोष्टी सरकारकडून आणल्या जातात, अशी टीका त्यांनी केली.इतके खोटे बोलणारे पंतप्रधान कधीही पाहिलेले नाहीत, असे सांगून सुरेश प्रभू यांनी बुलेट ट्रेनला विरोध केल्याने त्यांना रेल्वेमंत्रीपदावरून हटविल्याचा आरोप त्यांनी केला. विद्यमान रेल्वेमंत्री पीयूष गोयल काय टीसी होते का?, असा टोला लगावत राज म्हणाले की, यापेक्षा शिवाजी पार्कच्या प्रकाश आणि आस्वाद हॉटेलांतील पियुष जास्त चांगले असते...!सोमय्या गप्प का ?भाजपा खा. किरीट सोमय्या सुरुवातीला रेल्वेची उंची मोजत फिरत होते. ते साडेतीन वर्षांपासून गप्प आहेत. सत्ता आल्यावर सोमय्या झोपले आहेत, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
‘बुलेट’ची वीटही रचू देणार नाही, राज ठाकरे यांचं थेट आव्हान, ५ आॅक्टोबरला चर्चगेट स्टेशनवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 3:45 AM