Join us

ST कर्मचाऱ्यांसाठी राज ठाकरेंचा लढा, सरकारशी बोलणार पण आधी आत्महत्या थांबवा, कारण..

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 12:46 PM

संपाबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे सरकारशी संवाद साधणार आहे. सरकारसोबत माझं बोलणं झालं तर त्यापुढे काय करायचं हे कर्मचाऱ्यांना सांगेन असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील एसटी कर्मचारी रस्त्यावर उतरला आहे. एसटी कर्मचारी विविध मागण्यांसाठी आंदोलन(ST Workers Agitation) करत असून हा संप मागे घेण्यासाठी सरकारही दबावतंत्राचा वापर करत आहे. राज्य सरकारने आतापर्यंत ८०० हून अधिक कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तरीही संप मागे घेण्यास कर्मचारी तयार नाहीत. आता या आंदोलनाची धग मुंबईच्या मंत्रालयापर्यंत पोहचली आहे. मुंबईत आझाद मैदानावर एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने जमले आहेत.

दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे(MNS Raj Thackeray) यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत राज ठाकरेंनी सुरुवातीला शिष्टमंडळाला मी आत्महत्या करणाऱ्यांचं नेतृत्व करत नाही. आधी आत्महत्या थांबवा ही माझी अट आहे असं आवाहन केले. संपाबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे सरकारशी संवाद साधणार आहे. सरकारसोबत माझं बोलणं झालं तर त्यापुढे काय करायचं हे कर्मचाऱ्यांना सांगेन. आत्महत्या करु नका. आत्महत्या हा उपाय नाही. मनगटात बळ ठेऊन आपल्याला लढाई लढायची आहे. डाव अर्धवट सोडून जायचं नाही. मनसे कामगारांच्या पाठिशी आहे असं आश्वासन राज ठाकरेंनी शिष्टमंडळाला दिल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर(Bala Nandgoankar) यांनी दिली.

शिष्टमंडळाने राज ठाकरेंकडे मांडली व्यथा  

तुम्हीच महाराष्ट्राचे तारणहार आहे. १ लाख कुटुंबाचं प्रतिनिधीत्व मी करतोय. दिवाळी झाली आमच्या कुटुंबीयांचं काय झालं? आज ३७ आत्महत्या झाल्या उद्या ३७० होतील. महामंडळाचं विलिनीकरण करण्यासाठी आयोग निर्माण करा. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जो पगार आहे तोच एसटी कर्मचाऱ्यांना लागू करा इतकी सोपी मागणी आहे. हिवाळी अधिवेशनात मुद्दा मांडा आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात विषय मार्गी लावा अशी मागणी शिष्टमंडळाने राज ठाकरेंकडे केली.

मनसे कायदेशीर लढा देतंय

जेव्हापासून हा विषय सुरु आहे तेव्हापासून मनसेचे वकील संपाच्या बाजूने लढत आहेत. एसटी कामगारांच्या संपात मनसे सहभागी आहेत. कायदेशीर लढाई मनसे लढत राहणार आहे. राज ठाकरेंनी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेदना ऐकून घेतल्या. सुरुवातीला २८ संघटनांनी मिळून हा संप जाहीर केला. परंतु आता सगळ्या संघटना बाजुला ठेऊन स्वत: कर्मचारी रस्त्यावर उतरला आहे. एसटी महामंडळाचं विलिनीकरण करावं ही प्रमुख मागणी आहे. उच्च न्यायालयाने राज्य सरकारला १२ आठवड्यांची मुदत दिली आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही होईल. सरकारची भावना प्रामाणिक असेल तर राज्य सरकारने इतर सरकारी कर्मचाऱ्यांना जे वेतन दिलं जातं तितकचं वेतन कर्मचाऱ्यांना द्यावं असं शिष्टमंडळाने म्हणणं मांडलं आहे. मनसे कामगारांच्या पाठिशी ठाम असून या विषयावर राज ठाकरे जातीनं लक्ष घालणार असल्याचं बाळा नांदगावकर म्हणाले.

 

टॅग्स :एसटी संपमनसेराज ठाकरे