मुंबई - देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असून, त्यानिमित्त ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेला शनिवारपासून अत्यंत जल्लोषात प्रारंभ झाला. स्वातंत्र्यदिनी, सोमवारपर्यंत ही मोहीम चालणार आहे. देशभरातील शहरे, गावांमध्ये सर्वत्र घराघरांवर तिरंगा ध्वज डौलाने फडकताना दिसत आहे. या मोहिमेचे समाजातील सर्व स्तरांतून स्वागत झाले आहे. मुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्यापासून ते सर्वसामान्य नागरिकांनीही घरावर तिरंगा फडकवत या मोहिमेत उत्साह दाखवला. मनसेप्रमुखराज ठाकरे यांनीही त्यांच्या शिवतिर्थ या निवास्थानी तिरंगा ध्वज फडकवला आहे.
तिरंगा ध्वज घेऊन अनेक ठिकाणी शनिवारी मिरवणुका काढण्यात आल्या. श्रीमंतांच्या हवेलीपासून ते गरिबाच्या झोपडीवर तिरंगा ध्वज फडकत असल्याचे दृश्य भारावून टाकणारे होते. अनेक शहरांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा मिरवणुकांमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला. सामान्य नागरिकही यात मोठ्या संख्येने सहभागी झाले. मोठी माणसं आपल्या लहानग्यांना घेऊन या मोहिमेत सहभागी झाली आहेत. मनसेप्रमुखराज ठाकरे यांच्या घरी काही महिन्यांपूर्वी नातवाचे आगमन झाले. आता, त्यांच्या नातवाचा तिरंग्याकडे पाहतानाचा एक फोटो समोर आला आहे. एकप्रकारे या चिमुकल्या किआनने तिरंग्याला वंदनच केले, असे म्हणता येईल.
देशात चैतन्यमय वातावरण
‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत विविध राज्यांमध्ये तिरंगा हाती घेऊन शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मिरवणुका काढल्या. विविध पक्षांचे राजकीय नेते, मंत्री, सरकारी अधिकारी, सर्वसामान्य जनांच्या घरांवर तिरंगा डौलाने फडकत आहे. ठिकठिकाणच्या बाजारांमध्ये नागरिक तिरंगी कपडे खरेदी करताना दिसत आहेत. मोठ्या रहिवासी सोसायट्यांनीही तिरंगी रोषणाई करून या उत्साहात भर घातली आहे. अनेक विक्रेत्यांनही तीन रंगांची मिठाई तयार करण्यावर भर दिला आले. विविध चॅनेल्सवरही देशभक्तीपर गीते आणि सिनेमे दाखविले जात आहेत. एकूणच ‘हर घर तिरंगा’ मोहिमेमुळे साऱ्या देशात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे.