Join us  

राज ठाकरेंचा पाठीवर हात, तात्या खुश; कार्यकर्त्यांकडूनही लाल दिव्याची गाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 11:55 AM

शहराध्यक्ष पदावरुन पायउतार झाल्यानंतर मला राष्ट्रवादी आणि शिवसेनेची ऑफर आली.

मुंबई - पुण्यातील मनसेचे नेते माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्यावर मनसेप्रमुखराज ठाकरे नाराज असल्याची चर्चा माध्यमांत रंगली होती. पुण्यातील मनसेचं शहराध्यक्षपद वसंत मोरे यांच्याकडून काढून घेण्यात आलं होतं. त्यानंतर, साईनाथ बाबर यांची पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी, वसंत मोरेंनी जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली होती. मात्र, आपण मनसेतच राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. आता, पुन्हा एकदा वसंत मोरेंनी आपण राज ठाकरेंचा शिलेदार असल्याचं एका फोटोतून दाखवून दिलंय. 

शहराध्यक्ष पदावरुन पायउतार झाल्यानंतर मला राष्ट्रवादी आणि शिवसेनेची ऑफर आली. मात्र मी मनसेतच राहणार असल्याचं वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं होतं. मोरे यांची नाराजी अनेकदा चर्चेचा विषय ठरली, मात्र, त्यांची राज ठाकरेंवरील श्रद्धा कायम राहिली. आता, पुन्हा एकदा राज ठाकरे आणि वसंत मोरे यांच्यातील नेता-कार्यकर्ता प्रेमाचा फोटो वसंत मोरेंनी शेअर केला आहे. ''खूप दिवसांनी या मायेच्या हाताची ऊब आज पुन्हा खांद्यावर जाणवली. आज पुन्हा धन्य झालो'', अशी पोस्ट करत मोरेंनी राज ठाकरेंसमवेतचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे, मोरे आगामी निवडणुकांत मनसेकडूनच मैदानात उतरतील हे दिसून येतंय.  

दरम्यान, २ दिवसांपूर्वी वसंत मोरे शिवतिर्थ बंगल्यावर राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेले होते. त्यासंदर्भातील पोस्टही त्यांनी शेअर केली आहे. ''आज अखेर सुखसागरनगर भागातील त्या गरीब कुटुंबाला त्यांचे हक्काचे घर १४ लाख रु मध्ये घेवून दिलेच. आज त्या घराची चावी राजसाहेब ठाकरे आणि शर्मिला वहिनी राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवतीर्थ मुंबई येथे दिली,'' असे ट्विट वसंत मोरेंनी केले आहे. त्यामुळे, मोरेंचा हा फोटोही मुंबईतील शिवतिर्थ बंगल्यावरचा असल्याचे दिसून येते. त्याचवेळी राज ठाकरे यांनी वसंत मोरेंच्या पाठीवर हात ठेवलाय. 

वसंत मोरे लोकसभेसाठी इच्छुक

दरम्यान, पुणे लोकसभेसाठी मनसे नेते वसंत मोरे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे इच्छा व्यक्त केली आहे. जर पुणे लोकसभेसाठी मला उमेदवारी दिली तर नक्कीच आम्ही पुणेकरांचे प्रश्न सोडवू आणि पुणेकर भरभरून प्रेम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे हे पुणे लोकसभेचे पक्षाचे निरीक्षक म्हणून काम पाहत आहेत. या संदर्भात त्यांनी पुण्यात बैठका घेऊन उमेदवारीवर चर्चा देखील केली असून सविस्तर अहवाल पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे. यामध्ये वसंत मोरे यांचं देखील नाव आहे. 

वाढदिवसाचं गिफ्ट ॲम्बेसिडर कार

मनसेचे वसंत मोरे हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. मनसेतील अंतर्गत वादामुळे, कधी राज ठाकरेंच्या भेटीमुळे, कधी सभेला गैरहजरीमुळे तर आता पुन्हा एकदा वसंत मोरे वाढदिवसामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या वाढदिनी मध्यरात्री कार्यकर्त्यांनी चक्क लाल दिव्याची ॲम्बेसिडर कार त्यांना भेट दिली आहे. अखिल मोरे बाग मित्र मंडळाकडून वसंत मोरे यांना लाल दिव्याची ॲम्बेसिडर भेट देण्यात आली आहे. 

टॅग्स :मनसेराज ठाकरेपुणे