लोकमान्य सेवा संघाच्या शताब्दी उत्सवात होणार राज ठाकरेंची मुलाखत तर मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते सांगता
By मनोहर कुंभेजकर | Published: March 18, 2023 01:50 PM2023-03-18T13:50:10+5:302023-03-18T13:52:33+5:30
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार लोकमान्य सेवा संघाचा शताब्दी उत्सवाची होणार सांगता
मुंबई - शंभर वर्षापूर्वी पारले हे छोटसं गाव होते. १९२३ साली लोकमान्यांचे सार्वजनिक स्मारक म्हणजे लोकमान्य सेवा संघ स्थापन झाले. सप्टेंबर २०१९ मध्ये शतक महोत्सवी गणेशोत्सवाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे भेट देऊन संस्थेला शाबासकी दिली होती. तर आज ही संस्था आपले शताब्दी वर्ष साजरे करत आहे. सांस्कृतिक पारल्याचे प्रतिक असणारी पितृतुल्य संस्था लोकमान्य सेवा संघ पार्ले म्हणजेच टिळक मंदिर यावर्षी शताब्दी उत्सव साजरा करीत आहे. लोकमान्य सेवा संघाचा शतकपूर्ती सोहळा दि,१० मार्च ते दि,२२ मार्च या कालावधीत सायंकाळी संस्थेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर पटांगणात दिमाखात साजरा होत आहे.
बुधवार दि, २२ मार्चला गुढीपाडव्याच्या दिवशी शतक महोत्सवाचा सांगता समारंभ सायंकाळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. गुढी पाडव्याला संध्याकाळी पाच ते आठ या वेळेत शताब्दी लोकमान्य सेवा संघाची- शताब्दी सांस्कृतिक पार्ल्याची अशी संकल्पना घेऊन स्फूर्ती यात्रा काढण्यात येईल .या स्फूर्ती यात्रेत लोकमान्य सेवा संघाच्या विविध शाखांच्या कार्याचा गौरव करण्यात येईल अशी माहिती लोकमान्य सेवा संघाचे कार्याध्यक्ष उदय तारदाळकर यांनी दिली.
गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला मंगळवार दि,२१ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कलात्मक मनाचे कवडसे या विषयावर जेष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र हे दिलखुलास मुलाखत घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. संस्थेच्या शताब्दी महोत्सवाचा शुभारंभाला दि,१० मार्च रोजी माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी सामाजिक संस्था आज आणि उद्या या विष्यावर मार्गदर्शन केले. दि,११ मार्च रोजी प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांनी संस्थेच्या वर्धापनदिनी शंभर वर्षाचा लोकमान्य सेवा संघाचा इतिहास आणि भावसंगीताची वाटचाल असा एक अभिनव संगीतमय कार्यक्रम सादर केला.
लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांनी पार्लेकराना लोकमान्यांच्या जीवनातील लोकांना ज्ञात नसलेल्या गोष्टी सांगितल्या. नॅशनल स्टॉक एक्सचेंज प्रमुख आशिष चौहान यांनी गेल्या दीडशे वर्षाचा शेअर बाजाराचा इतिहास आणि त्या क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारताने घेतलेली झेप याचा इतिहास उलगडून सांगितला. दि,१५ मार्च रोजी ग्राहक पंचयातचे कार्याध्यक्ष अँड. शिरीष देशपांडे यांनी महारेरा कायद्याबद्दल सर्वांना संबोधित केले. आज दि,१८ रोजी खासदार पूनम महाजन या सामाजिक संस्था भविष्यातील वाटचाल या विषयावर मार्गदर्शन करणार आहे.तर रविवार दि,१९ मार्च रोजी लोकमान्य टिळकांचे गाढे अभ्यासक अरविंद गोखले संघातील सदस्यांना संबोधन करणार आहेत अशी माहिती उदय तारदाळकर यांनी दिली.