मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याची घोषणा केली असली तरी भाजपविरोधी प्रचार करणार आहेत. प्रचाराच्या रणधुमाळीत राज्यातील विविध ठिकाणी ते सभा घेणार असल्याची चर्चा मनसेतील सुत्रांनी दिली. या सभा स्वतंत्रपणे होणार की आघाडीचे उमेदवार सभास्थानी असणार याबाबत अद्याप संधिग्दता आहे. मात्र, काँग्रेस आघाडीच्या दिग्गज नेत्यांच्या मतदारसंघात राज ठाकरे यांच्या सभा होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावर टीकेची झोड उठवित भाजपच्या विरोधात काम करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. ६ तारखेला गुढी पाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवरील सभेत राजकीय कार्यक्रम जाहीर करण्याचा सुतोवाच केला होता. मनसेच्या कार्यकर्ता-पदाधिकाऱ्यांनी थेट काँग्रेस आघाडीच्या प्रचार सहभागी व्हावे की स्वतंत्रपणे भाजपविरोधात प्रचार करायचा, राज ठाकरे नेमक्या किती सभा घेणार आणि कुठे घेणार असे विविध प्रश्न मनसैनिकांनाही पडले आहेत. याबाबत शिवाजी पार्कवरील सभेत राज ठाकरे खुलासा करणार असल्याचे मनसेतील सुत्रांनी स्पष्ट केले.
राज्यात साधारण सहा ते नऊ जागांवर राज यांच्या सभा होतील. यात बारामती, मावळ, नाशिक, नांदेड, सातारा, सोलापूर, उत्तर मुंबई, उत्तर पूर्व आणि उत्तर मध्य मुंबई आदी लोकसभा मतदारसंघाची चर्चा आहे. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, चर्चेतील सर्व मतदारसंघ हे आघाडीच्या दिग्गज नेत्यांचे मतदारसंघ आहेत. त्यामुळे आघाडीतील दिग्गजांसाठी मनसेची तोफ धडाडणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.