मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भूमिकेबाबत मुख्यमंत्र्यांनी आपली मत मांडलं आहे. राज ठाकरेंसोबत जे काही जनमत होतं, तेही आता जाणार. राज ठाकरेंसोबत गेलेली मंडळी हे मनानं हिंदुत्ववादी आहेत. मनाने ते शिवसेना आणि भाजपाचे मतदार आहेत. राज ठाकरेंनी कितीही सभा घेतल्या, तरी त्यांचा मतदार, मनसेचा 2 ते 4 टक्के मतदार त्यांच्याकडून तुटेल. कारण, त्यांच्या मतदारांना मोदी हवेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे काँग्रेस उघडी पडतेय. कारण, काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळेच, काँग्रेसने मनसेला महाआघाडीत घेतले नाही. जर, मनसेला महाआघाडीत घेतले तर बिहार आणि उत्तर प्रदेशात काय उत्तर द्यायचं, असा प्रश्न काँग्रेसपुढे आहे. त्यामुळे, राज ठाकरेंच्या सभा म्हणजे मान न मान मै तेरा मेहमान. राज ठाकरेंनी कितीही गरळ ओकली. तरी, त्यांच्या पक्षातील मोदी समर्थक आम्हालाच मतदान करतील. त्यामुळे राज यांच्या सभेचा भाजपालाच फायदा होईल, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे यांच्या मुंबईतील सभेची जोरदार चर्चा सुरू आहे. सभेला झालेली गर्दी तसेच ठाकरे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यावर केलेल्या टीकेची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगली आहे. सभेत त्यांनी राज्यभरात 8-10 सभा घेण्याचे जाहीर केले आहे. मावळमध्येही त्यांची सभा होण्याची शक्यता आहे. त्या भाजपा नेत्यांकडून राज ठाकरेंच्या भूमिकेवर टीका करण्यात येत आहे. राहुल गांधींना पंतप्रधानपदासाठी संधी देण्याची राज ठाकरेंची भूमिका शरद पवारांना तरी पटेल का, असा प्रश्न शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी विचारला आहे. तर, मुख्यमंत्री फडवणीस यांनी राज यांच्या सभेचा भाजपालाचा फायदा होईल, असे म्हटले आहे.