मुंबई : लोकसभेच्या निकालानंतर राज्यातील महाआघाडीच्या प्रयत्नांना वेग आला आहे. युतीच्या विरोधातील विविध नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे ४५ मिनिटे राजकीय विषयांवर चर्चा झाल्याचे समजते.राज्यात युतीला मिळालेल्या यशानंतर महाआघाडीतील नेत्यांची लगबग वाढली आहे. मंगळवारी राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीसह मित्रपक्षांची बैठक झाली. या बैठकीत विधानसभेला मनसेला बरोबर घ्यावं असा सूर महाआघाडीच्या नेत्यांचा होता. युतीविरोधातील मनसे, वंचित आघाडीलाही महाआघाडीत घेण्याची भूमिकाही मांडली जात आहे. मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. या भेटीचा तपशील जाहीर करण्यात आला नाही. त्यानंतर आता राज यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना पेव फुटले आहे. लोकसभेच्या निकालानंतर पवार-ठाकरे यांची ही पहिलीच भेट आहे. निवडणुकीपुर्वी या दोन्ही नेत्यांच्या भेटींमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. विशेषत: उस्मानाबाद येथील सभेनंतर पवारांनी वाटवाकडी करत सभेसाठी सोलापूरात डेरेदाखल झालेल्या राज ठाकरेंची भेट घेतली होती. शरद पवार आणि राष्ट्रवादीने लोकसभा लढतीपुर्वीही मनसेला सोबत घेण्याबाबत जाहीर विधाने केली होती.>मनसेचे उमेदवार असते तर झाला असता फायदालोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा न करता राज यांनी नरेंद्र मोदी व अमित शहा मुक्त भारताची हाक देत प्रचारसभांचा धडाका लावला होता. या सभांची मोठी चर्चाही झाली. मात्र, निकालावर त्याचा अपेक्षित परिणाम पाहायला मिळाला नाही. राज यांनी उमेदवार दिले असते तर जास्त फायदा झाला असता, अशी भावना स्वत: शरद पवार यांनी निकालानंतरच्या एका मुलाखतीत व्यक्त केली होती. त्यामुळे आता मनसेला सोबत घेऊन महाआघाडीच्या माध्यमातून भाजप-शिवसेना युतीला सामोरे जाण्याची चर्चा सुरू आहे.
मनसेला महाआघाडीत घेण्याचे प्रयत्न सुरू, राज ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 5:07 AM