मुंबई - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस हा वाद आता चिघळताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. त्यानंतर, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना फटकारले आहे. दीडदमडीच्या लोकांनी राज ठाकरे यांच्याविषयी बोलू नये. त्यांची तेवढी लायकी नाही, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले. आता, अमेय खोपकर यांनीही मिटकरींना मनसेस्टाईल टोला लगावला आहे.
"राष्ट्रवादी नाव असणारा पक्ष महाराष्ट्रात अतिशय संकुचित आणि जातीपातीचं राजकारण करत आहे. मनसेला त्यांच्याकडून काही शिकायची गरज नाही. राज्यात जातीपातीचं विष पेरणारे हे लोक महाराष्ट्रद्रोही आहेत", असं संदीप देशपांडे म्हणाले. तर, मनसेचे उपाध्यक्ष अमेय खोपकर यांनीही टोला लगावला आहे. आता कुठं मिसरुड फुटलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारानं राज ठाकरेंचं नाव उच्चारतानाही दहावेळा विचार करायला हवा. राज ठाकरेंवर मिटकरीसारख्या बगलबच्च्यांनी टीका करणं म्हणजे निव्वळ पोरकटपणा आहे. दोन मोठी माणसं बोलत असताना आपलं तोंड मिटून ठेवावं हे एका राष्ट्रीय म्हणवणाऱ्या पक्षाच्या अतिसामान्य नेत्याला कळू नये, हे केवढं मोठं दुर्दैव, असे म्हणत खोपकर यांनी मिटकरींवर प्रहार केला आहे.
अमोल मिटकरींनी केली होती टीका
राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे राज्यात जातीपातीचं राजकारण वाढल्याचं विधान केल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज ठाकरेंवर टीका करण्यास सुरुवात केली. यात राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. "राष्ट्रवादी पक्षावर जातीयवादाचा आरोप कोण करतोय तर ज्यांनी महाराष्ट्रात दक्षिण भारतीय व उत्तर भारतीय हा द्वेष निर्माण करण्याचे महापातक करुन राष्ट्रद्रोह केला ती व्यक्ती! अपयशी नेत्याला उत्तर देणं म्हणजे घाणीवर दगड फेकून अंगावर घाण उडवून घेणे आहे", अशा शब्दांत अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला होता.