मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका व्यंगचित्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांना टार्गेट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासाठी सोशल मीडियावरील 'परतीचा पाऊस' डोकेदुखी ठरत असल्याचा टोला राज ठाकरे यांनी चित्राद्वारे हाणला आहे. राज ठाकरे यांनी हे चित्र आपल्या फेसबुक पेजवर शेअर केले आहे.
आपल्या फेसबुक पेज लाँचवेळी राज ठाकरे यांनी सोशल मीडियाचा वापर करुन सत्तेत आलेल्या भाजपाला दुटप्पी भूमिकेवरुन खडे बोल सुनावले होते. भारतीय जनता पक्षाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जे पेरलं तेच आता उगवलंय. खोटी माहिती पसरवण्यासाठी, लोकांची मनं कलुषित करण्यासाठी जे सोशल मीडिया नावाचं अस्त्र भाजपने वापरलं ते आता त्यांच्यावर बुमरँग झालंय अशी टीका राज ठाकरेंनी केली होती.
पंतप्रधान स्वतःला प्रधान सेवक म्हणवतात आणि जनतेला राजा, मग राजाने सेवकाला कामचुकारीबद्दल प्रश्न विचाराचे नाहीत? आणि सोशल मीडियावर जाब विचारला म्हणून तुम्ही नागरिकांना पोलिसांकरवी नोटीसा धाडणार? पंतप्रधानांच्या फसलेल्या योजनांविषयी लिहिलं, त्यामुळे कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल आणि पोलिसांना जर धडाधड नोटिसा पाठवायला लावणार असाल तर मग तुम्ही पोसलेल्या लाखो 'ट्रोल्सचं' काय? असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी विचारला होता.
'ज्या सोशल मीडियाच्या जोरावर यांनी निवडणुका जिंकल्या, तोच मीडिया आज यांच्यावर उलटला आहे. अनेक भक्तांनीही डोळ्यांवरच्या पट्ट्या काढल्यात आणि तेही सरकारवर टीका करू लागलेत', अशी चपराक राज ठाकरे यांनी त्यांच्या फेसबुक पेजच्या लॉन्चिंगवेळी लगावली होती. शिवाय, नरेंद्र मोदींचे 48 टक्के तर, राहुल गांधींचे 54 टक्के फॉलोअर्स फेक खोटे असल्याचा आरोप राज यांनी केला होता.
यापूर्वी राज ठाकरे यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पंतप्रधान मोदींना फरफटत आणत असल्याचे व्यंगचित्र फेसबुकवर शेअर केले होते. दाऊद फरफटत आणत असतानाही मोदी म्हणजेच केंद्र सरकार मात्र आपण फरफटत आणल्याचा दावा करत असल्याचं व्यंगचित्रातून दाखवण्यात आले होते. एक 'तर्क'चित्र काढत राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि भाजपा सरकारवर ताशेरे ओढले.
फेसबुक पेज लाँचच्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी स्वतः दाऊदला भारतात यायचे असून तो केंद्र सरकारशी सेटलमेंट करत आहे, असा दावा केला होता. यावरच आधारित व्यंगचित्र राज ठाकरेंनी रेखाटलं व दाऊद स्वत:हून भारतात येत आहे, असं दाखवलं. व्यंगचित्रात दाऊद इब्राहिम मोदींना फरफटत आणताना दाखवण्यात आले आहे. मात्र तरीही मोदी आणलं की नाही फरफटत असं सांगत सर्व श्रेय घेत असल्याची उपहासात्मक टीका करण्यात आली आहे.