Join us

शरद पवारांना लता दिदींचा फोन, राज ठाकरे अन् मुख्यमंत्र्यानीही केली विचारपूस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 1:54 PM

शरद पवार यांच्या प्रकृतीची रविवारी संध्याकाळी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात तपासणी करण्यात आली. पुढील उपचारासाठी ३१ मार्च रोजी त्यांना रुग्णालय दाखल करण्यात येणार आहे

ठळक मुद्देराजकीय नेत्यांकडूनही शरद पवारा यांच्या प्रकृतीसंदर्भात संबंधितांना विचारण्यात येत आहे. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही फोनद्वारे शरद पवार यांच्याशी संपर्क साधला.

मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. रविवारी संध्याकाळी त्यांच्या पोटात दुखल्यामुळे थोडासा अस्वस्थपणा जाणवत होता, म्हणूनच तपासणीसाठी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले. निदान झाल्यानंतर, त्यांच्या पित्ताशयामध्ये एक समस्या असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली. तर, दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनीही व्हॉट्सअप स्टेटसद्वारे वडिल शरद पवारा यांचे पुढील 15 दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे सांगितले. त्यानंतर, देशभरातून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस होत असून त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे. 

शरद पवार यांना रविवारी संध्याकाळी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले होते. पुढील उपचारासाठी ३१ मार्च रोजी त्यांना रुग्णालय दाखल करण्यात येणार आहे. वैद्यकीय तपासणीनंतर कुठलीही औषधे न घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. एन्डोस्कोपीनंतर त्यांच्यावरआवश्यक त्या सर्जरी करण्यात येतील. तोपर्यंत त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. तर, सुप्रिया सुळे यांनीही व्हॉट्सअप स्टेट्सद्वारे माहिती दिली आहे. शरद पवार यांच्या प्रकृती समजताच सोशल मीडियातून त्यांच्यावर उत्तम प्रकृतीसाठी आणि लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे. 

राजकीय नेत्यांकडूनही शरद पवार यांच्या प्रकृतीसंदर्भात संबंधितांना विचारण्यात येत आहे. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मुख्यमंत्र्यांच्या सदिच्छा या महाराष्ट्राच्या प्रातिनिधिक भावना आहेत, त्यांचे मनपूर्वक आभार! असे पवार यांनी म्हटले. तसेच, भारतरत्न लता मंगेशकर, आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनीही शरद पवार यांना फोन करुन त्यांची आस्थेनं विचारपूस केली.  

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही शरद पवार यांच्या प्रकृतीची आस्थेनं विचारपूस केली. याबाबत, स्वत: शरद पवार यांनी ट्विटरवरुन माहिती दिली. तसेच, राज यांच्यासह सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत. आपल्या सर्वांच्या सदिच्छा माझ्यासोबत आहेत, असेही पवार यांनी म्हटलं. 

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेना