Join us

'भाजपासोबत खुर्च्यांमध्ये बसून अंडी उबवताय ना', राज ठाकरेंची शिवसेनेवर सडेतोड टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2017 12:47 PM

एल्फिन्स्टन आणि परळ ब्रिजवरील दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर राज ठाकरे यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारसोबत शिवसेनेवरही टीका केली. 

ठळक मुद्देएल्फिन्स्टन आणि परळ ब्रिजवरील दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर राज ठाकरे यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतलीयावेळी बोलताना राज ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारसोबत शिवसेनेवरही टीका केलीएका बाजूने म्हणायचं सरकार आमचं ऐकत नाही, मग बसलात कशाला तिकडे असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेला विचारलामुंबईमध्ये बुलेट ट्रेनची एकही वीज रचली जाणार नाही, असा थेट इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे

मुंबई - एका बाजूने म्हणायचं सरकार आमचं ऐकत नाही, मग बसलात कशाला तिकडे असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेला विचारला आहे. एल्फिन्स्टन घटनेचा निषेध करणा-या शिवसेनेवर टीका करताना राज ठाकरे बोलले की, 'तुम्ही आहात ना बसलात ना सत्तेमध्ये, खुर्च्यांमध्ये बसून अंडी उबवताय ना त्यांच्याबरोबरीने. हे शिवसेनेचेच लोक आहेत ना जे तिकडे खासदार, मंत्री होऊन बसलेत, इथेही मंत्री होऊन बसलेत ना. एका बाजूने म्हणायचं सरकार आमचं ऐकत नाही, मग बसलात कशाला तिकडे. दांभिक खोटे आहेत हे सगळे'. एल्फिन्स्टन आणि परळ ब्रिजवरील दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर राज ठाकरे यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारसोबत शिवसेनेवरही टीका केली. 

इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान कधी पाहिलेला नाहीसरकार आपली आश्वासनं पुर्ण करत नाही आहे असं वाटतं का ? विचारलं असता राज ठाकरे बोलले की, 'हे खोटं बोलूनच सत्तेवर आले आहेत. सगळा सोशल मीडिया पाहिल्यावर लक्षाय येतं की निवडणुकीआधी काय बोललेत आणि नंतर काय बोलतायत. इतकं धादांत खोटं बोलणारं सरकार आणि पंतप्रधान मी कधीच पाहिलेलं नाही. आणि या सगळ्याचा शेवट काय असणार तर अमित शहा येणार आणि म्हणणार हा चुनावी जुमला आहे'. 

बुलेट ट्रेनला विरोध केल्याने सुरेश प्रभूंना हटवलं यावेळी राज ठाकरेंनी माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचं कौतुक केलं. बुलेट ट्रेनला विरोध केल्याने त्यांना हटवण्यात आल्याची टीका राज ठाकरेंनी केली. 'सुरेश प्रभू चांगलं काम करत होते. त्यांना का हटवलं कळलं नाही. इमाने इतबारे तो माणूस चांगलं काम करत होता. आयत्या वेळेला यांच्या बुलेटच्या ट्रेनच्या लाडापायी सुरेश प्रभूंना हटवण्यात आलं. पियूष गोयल काय आधी टीसी होते', असं राज ठाकरे बोलले आहेत. 

मुंबईत बुलेट ट्रेनची एकही विट रचू दिली जाणार नाहीमुंबईमध्ये बुलेट ट्रेनची एकही वीज रचली जाणार नाही, असा थेट इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. मुंबईमध्ये रस्त्यांवर लोकांना चालणं मुश्किल मग बुलेट ट्रेन कशाला? असा सवालही राज ठाकरे यांनी विचारला. मुंबईत बुलेट ट्रेनचं काम करण्यासाठी जर कोणी अरेरावी करणार असेल, तर त्याला आम्हीही तसंच उत्तर देऊ, असंही राज ठाकरे यांनी म्हंटलं आहे. आपल्याकडे आहेत त्या गोष्टी होत नाहीत. आणि नवीन गोष्टी सरकारकडून आणल्या जात असल्याची टीका राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. मुंबईमधील रेल्वे स्टेशन आणि ट्रेनची परिस्थिती जोपर्यंत सुधारली जाणार नाही तोपर्यंत बुलेट ट्रेनची एकही वीट रचली जाणार नाही. मोदींनी हवी तर गुजरात मध्येच बुलेट ट्रेन चालवावी असं यावेळी राज ठाकरेंनी सांगितलं.

पाच तारखेला चर्चगेला मनसेचा मोर्चा एल्फिन्स्टन स्टेशनवर घडलेल्या घटनेबद्दल राज ठाकरे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. ही घटना दुर्दैवी आहे असं राज ठाकरे यांनी म्हंटलं आहे. या दुर्घटनेच्या निषेधार्थ राज ठाकरे 5 ऑक्टोबर रोजी चर्चगेटमधील पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयावर  मोर्चा काढणार आहेत. या मोर्चामध्ये राज ठाकरे स्वतः सहभाग घेणार असून मुंबईकरांनीसुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे. 5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मोर्चातून सरकारला त्यांच्या कामाबद्दल जाब विचारणार असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हंटलं आहे.

किरीट सोमय्यांवर साधला निशाणापत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरेंनी भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांच्यावरही टीका केली आहे. सुरूवातीला रेल्वेची उंची मोजणारे किरीट सोमय्या आता गप्प का? साडेतीन वर्षापासून ते गप्प आहेत, सत्ता आल्यावर आधी पाठपुरावा करणारे आता झोपले, असं राज ठाकरेंनी म्हंटलं आहे. विरोधी पक्षात असताना किरीट सोमय्या ईव्हीएम मशिनच्या मुद्द्यावर सडकून टिका करत होते, आता ते गप्प का? असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे.

परप्रांतियांमुळे पायाभूत सुविधांना बोजवारामुंबईमध्ये परप्रांतियांचे लोंढे येणं काही थांबत नाही. दररोज हजारो लोक मुंबईत येतात. त्यामुळे आधीच कोसळलेल्या पायाभूत सोयीसुविधा अपूऱ्या पडत असल्याचं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं आहे. 

मुंबईत माणसं मारायला दहशवादी कशाला हवेत?मुंबईमध्ये दररोज काही ना काही घडल्याचं ऐकायला मिळतं. अनेक लोक मारले जातात. मुंबईतील माणसं मारायला आपलीच माणसं काफी आहेत. त्यासाठी पाकिस्तानातीला दहशतवादी किंवा चीनची काय गरज, अशी घणाघाती टीका राज ठाकरे यांनी केली आहे. 

 

टॅग्स :राज ठाकरेएलफिन्स्टन चेंगराचेंगरीनरेंद्र मोदी