मुंबई – एखाद्या सणानिमित्त प्रत्येकजण काही ना काही नवीन घेण्याचा अथवा नवा संकल्प बनवत असतो. कुणी घरं घेतं तर कुणी गाडी घेतं. सणासुदीच्या काळात शुभारंभ करण्याचा सगळेच प्रयत्न करतात. दादर येथील कृष्णकुंजचं नाव काढलं तर आपोआप मनसे अध्यक्ष राज ठाकरे(MNS Raj Thackeray) यांचं निवासस्थान समोर येते. राज ठाकरे आणि कृष्णकुंज हे जणू समीकरणच बनलं आहे. आता हे सांगण्यामागचं कारण काय असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
महाराष्ट्रात बड्या नेत्यांचे आणि त्यांच्या बंगल्याचे नाव सर्व कायकर्त्यांसाठी परिचयाचे आहे. शरद पवार म्हटलं तर सिल्व्हर ओक, गोविंदबाग, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे म्हटलं तर मातोश्री तसं राज ठाकरे म्हटलं तर कृष्णकुंज. मात्र आता राज ठाकरेंची ही ओळख बदलणार आहे. दिवाळीच्या पाडव्यानिमित्त राज ठाकरे नव्या घरात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. अद्याप या घराला नाव देण्यात आलं नाही. परंतु कृष्णकुंजशेजारील ५ मजली इमारत हे राज ठाकरेंचं नवं घर असेल. राज ठाकरे सहकुटुंब या नव्या घरात गृहप्रवेश करणार आहेत यासाठी जय्यत तयारी सुरू आहे.
मागील अनेक वर्षापासून राज ठाकरे कृष्णकुंज निवासस्थानी राहत आहेत. याच ठिकाणी पक्षाचे कार्यकर्ते किंवा इतर नेते मंडळी राज ठाकरेंना भेटायला येतात. मनसे रणनीतीच्या बैठकाही राज ठाकरे कृष्णकुंजवर घेतात. परंतु आता राज ठाकरे या ५ मजल्याच्या इमारतीत राहायला जाणार आहेत. त्यामुळे यापुढे राज ठाकरेंना भेटण्यासाठी येणारे कार्यकर्ते त्यांच्या नवीन घरी जमा होतील.
कसं आहे राज ठाकरेंचं नवं घरं?
राज ठाकरेंच्या या ५ मजली इमारतीत पहिल्या मजल्यावर समिती कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच याच इमारतीत कार्यालयही असेल. पक्षाच्या बैठका, भेटीगाठी येथेच आयोजित करण्यात येतील. इतर मजल्यांवर ठाकरे कुटुंबाच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व सोयी-सुविधांनी सज्ज असलेल्या या घरात भव्य ग्रंथालयदेखील उभारण्यात आले आहे. या नव्या इमारतीचं काम पूर्ण झालं असून लवकर राज ठाकरे कुटुंबीय या घरात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.