Join us

...तर गालावर वळ उठतील हे निश्चित; मुलुंडच्या घटनेवरून राज ठाकरेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 12:14 PM

दोन दिवसापूर्वी मुलुंडमध्ये मराठी महिलेला ऑफिससाठी गुजराची पिता पुत्रांनी जागा नाकारल्याची घटना समोर आली होती.

मुंबई- दोन दिवसापूर्वी मुलुंडमध्ये मराठी महिलेला ऑफिससाठी गुजराची पिता पुत्रांनी जागा नाकारल्याची घटना समोर आली होती. ही घटना तृप्ती देवरुखकर या महिलेने फेसबुकवर व्हिडीओ शेअर करत सांगितली होती. यानंतर काही वेळातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंलुंडमध्ये जात त्या घटनेचा निषेध करत संबंधीत गुजराची पित्रा, पुत्रांना जाब विचारला होता. यानंतर राज्यभरातून प्रतिक्रीया आल्या होत्या. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांचे कौतुक करत इशाराही दिला आहे. 

बारामती ॲग्रोवरील कारवाईबाबत शरद पवारांना प्रश्न; एका वाक्यात दिली प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट शेअर केली आहे, यात त्यांनी इशाराही दिला आहे. "मुंबईत, मुलुंडमध्ये एका मराठी स्त्रीला, ती मराठी आहे म्हणून व्यवसायासाठी जागा नाकारल्याची घटना समोर आली. इतरांनी निषेध वैगरे व्यक्त केला. आम्हाला निषेध नोंदवणं इत्यादी प्रकार माहित नाहीत. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या पद्धतीने दम दिल्यावर त्या बिल्डिंगच्या सचिवाने माफीनामा दिला, असं या पोस्टमध्ये म्हटले आहे.

"हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित. आणि सरकारने पण जरा आपला धाक दाखवला पाहिजे, असा सल्लाही राज्य सरकारला ठाकरे यांनी दिला आहे. काल मुलुंडमध्ये माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जाऊन जी समज दिली त्यांचं मनापासून अभिनंदन. तुमचं कायम लक्ष असतंच आणि मराठी माणसावर कुठेही अन्याय झालं तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आठवते. हे असंच सुरु राहिलं पाहिजे. अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे, असंही राज ठाकरेंनी पोस्टमध्ये म्हटले आहे. 

मुलुंड घटनेतील पिता, पुत्रांना जामीन मंजूर

मुंलुंड येथील घटनेनंतर जागा नाकारणाऱ्या गुजराती पिता पुत्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तृप्ती देवरुखकर यांच्या तक्रारीवरून मुलुंड पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर काल त्यांचा जामीन झाला आहे. प्रविण ठक्कर आणि त्यांचा मुलगा निलेश ठक्कर या दोघांनी तृप्ती देवरुखकर यांना मराठी असल्याने ऑफीससाठी जागा भाड्याने देण्यास नकार दिला होता.

टॅग्स :राज ठाकरेमनसे