मुंबई- अलीकडेच मुंबईतील खारघर परिसरात झालेल्या महाराष्ट्र भुषण पुरस्कार सोहळ्यानंतर 13-14 श्रीसदस्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर राज्यातील राजकारण तापले आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर निष्काळजीपणाचे आरोप केले जात आहेत. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली.
राज ठाकरे यांच्यासह मनसेच्या शिष्टमंडळाने आज सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. बीडीडी चाळीचा पुनर्विकास, सिडकोतील घरांच्या किमती यासह इतर महत्वाच्या विषयांवर ठाकरे-शिंदे यांच्यात चर्चा झाली. यावेळी अनेक अधिकारीदेखील तिथे उपस्थित होते. या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
संबंधित बातमी- अनेक प्रलंबित विषयांवर मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा; सकारात्कम प्रतिसाद मिळाला- राज ठाकरे
यावेळी राज ठाकरेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला की, खारघर घटनेत सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. त्यावर राज ठाकरे म्हणाले की, कोरोना काळातही सरकारकडून अनेक हलगर्जीपणाच्या घटना घडल्या आहेत. त्या घटनांमध्येही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करता येऊ शकतो. उगाच यात राजकारण करण्याची गरज नाही. तो कार्यक्रम सकाळी नव्हता करायला पाहिजे होता. धर्माधिकारी यांचा सत्कार राजभवनात झाला असता तर बर झालं असतं. पण, तो अपघात आहे, त्याचे राजकारण करण्याची गरज नाही, अशी स्पष्टोक्ती राज ठाकरेंनी केली.
मराठी विषय बंद होणार नाहीयावेळी राज ठाकरेंनी इतर विषयांवरही भाष्य केले. अवकाळी पावसासंबंधी मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली, लवकरच आदेश निघेल, असे ते म्हणाले. तसेच, मराठी शाळेचा विषय मुख्यमंत्र्यांना माहित नव्हता. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सरकारकडून याबाबत कुठलाही आदेश निघाला नाही. मुख्यमंत्री आता या विषयात पाहतील आणि त्यावर निकाल लावतील. पण, कुठल्याही शाळेत मराठी विषय बंद होणार नाही, अशी माहितीही ठाकरे यांनी दिली.