Raj Thackery: राज ठाकरेंचा राजकीय गेम होऊ शकतो, शिवसेनेचा मनसेला सावध इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 09:47 PM2022-05-11T21:47:22+5:302022-05-11T21:52:32+5:30
राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात मोर्चा उघडला आहे.
मुंबई - मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर, मनसेकडून होत असलेल्या भोंगा आंदोलनाला पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याचे सांगत मनसैनिकांना नोटीशी पाठवल्या आहेत. मनसे कार्यकर्त्यांवर होणाऱ्या कारवाईवरुन राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून तंबीच दिली. सत्तेचं ताम्रपत्र घेऊन तुम्हीही आला नाहीत, असा इशाराच दिला. त्यामुळे, शिवसेना आणि मनसेत सामना रंगला आहे. आता शिवसेनेच्या आमदार निलम गोऱ्हे यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.
राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात मोर्चा उघडला आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे यांनी शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका घेतलीय. महत्वाची बाब म्हणजे राज ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर टीका करत असले तरी भाजप विरोधात त्यांनी मौन पाळल्याचं पाहायला मिळत आहे. त्यावरुन, शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
राज ठाकरे यांचा राजकीय गेम होऊ शकतो, असा दावाच निलम गोऱ्हे यांनी केला आहे, त्या आज सांगलीत बोलत होत्या. पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, राज ठाकरे यांचा राजकीय गेम म्हणजे त्यांच्यासोबत भाजप राजकीय कुरघोडी करू शकते. राज ठाकरे भाजपबद्दल अनुकूल भूमिका घेत आहेत. पण, भाजप काम झाले की राज ठाकरेंना वाऱ्यावर सोडेल. इसापनीतीची कथा अशीच आहे. आम्ही भाजपचा अनुभव घेतला आहे. भाजप त्यांना तिकीट वाटपावेळी वाऱ्यावर सोडून देईल. कारण, भाजपला उत्तर भारतीयांची मतं हवी असतात. त्यामुळे हा धडा त्यांना लक्षात येईल, असे अंदाज भाकीतच गोऱ्हेंनी वर्तवले आहे. तसेच, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांमध्ये राजकीय भूमिका वेगवेगळ्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.