मुंबई - कोकणातील मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. विध्वसंक प्रकल्प कोकणात आणण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. तुमच्या जमिनी बळकावण्याचे परप्रांतियांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तुम्ही तुमच्या जमिनी देऊ नका, तुम्ही सावधान राहा, असे राज यांनी म्हटले. तसेच सर्व कोकणवासियांना गणेशोत्सवासाठी शुभेच्छा देताना जपून जा आणि जपून परत मुंबईला या, असा सल्लाही राज यांनी कोकणवासियांना दिला.
राज ठाकरेंनी मेळाव्याचे भाषण सुरू करण्यापूर्वी आंबेनळी दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर, कोकणवासी हेही कोकणातील रस्त्यांप्रमाणेच वळणवळणाचे आहेत, असे म्हटले. तर कोकणातील जमिन हे वैभव असून शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. मात्र, सर्वच राजकीय पक्षांनी कोकणाकडे दुर्लक्ष केलं. कोकणातील जमिन परप्रांतीय बळकावत आहेत, त्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे, असे राज यांनी म्हटले. कोकण ही भारतरत्नांची भूमी आहे. एकट्या दापोलीतून 4 भारतरत्न देशाला मिळाले आहेत, असेही राज यांनी आपल्या भाषणात सांगितले.