Video: रायगडावर 'राज'भेट; मुख्यमंत्री शिंदेंनी अमित ठाकरेंना जवळ बोलावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 07:14 PM2023-06-02T19:14:34+5:302023-06-02T19:16:03+5:30
मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवराज्यभिषेक सोहळ्यात प्रतापपगड प्राधिकरणाची घोषणा केली.
रायगड/मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यंदाचे वर्ष हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज तिथीप्रमाणे हा सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही आवर्जुन सहकुटुंब हजेरी लावली होती. या दरम्यान, रायगडावर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि ठाकरे कुटुंबीयांची भेट झाली.
मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवराज्यभिषेक सोहळ्यात प्रतापपगड प्राधिकरणाची घोषणा केली. विशेष म्हणजे या प्राधिकरणाच्या प्रमुखपदी उदयनराजे भोसलेंनी काम पाहावं असंही त्यांनी सूचवलं. तर, देवेंद्र फडणवीस यांनी, शिवरायांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक साजरा करण्यासाठी राज ठाकरे हेही सहकुटुंब रायगडावर आले होते. त्यांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना सपत्नीक अभिवादन केले. यावेळी, त्यांचा मुलगा अमित आणि सुनबाई व नातूही सोबत होते. म्हणजेच, राज यांनी सहकुटुंब अभिवादन करत जुन्या आठवणी जागवल्या. येथे स्वर्गीय बाळासाहेबांसोबत येत होतो, असे सांगत बाबासाहेब पुरंदरे यांचीही आठवण काढली.
दरम्यान, रायगडावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांनी भेट झाली. या भेटीत एकमेकांचं हस्तांदोलन करत राज स्वागत आणि औपचारीक गप्पा झाल्या. यावेळी, उपस्थितांनी एकत्रित फोटो घेण्याची मागणी केली. त्यावेळी, प्रमुख नेतेमंडळीच फोटो फ्रेममध्ये येत होती. तर, अमित ठाकरे हे बाजुला सरकले होते. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांनी अमित ठाकरेंना बोलावून आपल्याशेजारी उभारण्याचे सांगितले. त्यानंतर, अमित ठाकरे हे एकनाथ शिंदेंच्याजवळ उभा राहिले. रायगडावरील या भेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.