लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आगामी लोकसभा निवडणुका आणि मनसेचागुढीपाडवा मेळावा असे समीकरण जुळून आल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. महायुतीत सामील होण्याची चर्चा कुठे येऊन थांबली आणि भविष्यातील पक्षाची वाटचाल कशी असेल, याबाबत राज ठाकरे हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यातूनच लोकसभा लढविणार की थेट विधानसभा, महायुतीला पाठिंबा देणार का, यांसह अनेक प्रश्नांची उत्तरे शिवाजी पार्क येथील मेळाव्यातून मिळणार आहेत.
२०१४ आणि २०१९ अशा सलग दोन लोकसभा निवडणुका न लढणाऱ्या मनसेने २०२४च्या निवडणुकीतील भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. राज ठाकरे यांनी मध्यंतरी नवी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांची भेट घेतली होती.
राज आमच्या सोबत येतील : फडणवीसमनसेने हिंदुत्वाची भूमिका घेतली तेव्हापासून आमची राज ठाकरेंसोबत जवळीक वाढली आहे. त्यामुळे ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील, अशी अपेक्षा आहे. युतीसंदर्भात आमच्या चर्चा झाल्या आहेत. याबाबतचा निर्णय राज ठाकरे यांना घ्यायचा आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.