मुंबई : २००६ मुंबई लोकल बॉम्बस्फोट प्रकरणातील अपील चालविण्याबाबत सरकार गंभीर नाही, अशा शब्दांत न्या. नितीन सांब्रे व न्या. राजेश पाटील यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला सुनावल्यानंतर ज्येष्ठ वकील राजा ठाकरे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबाबतची माहिती शुक्रवारी सरकारने उच्च न्यायालयाला दिली. न्यायालयाने ५ ऑक्टोबरपासून या प्रकरणी दैनंदिन सुनावणी घेण्याबरोबरच कोणत्याही कारणास्तव सुनावणी तहकूब करणार नाही, अशी तंबीही दोन्ही पक्षांच्या वकिलांना दिली.
आतापर्यंतची न्यायालयीन घडामोड
लोकल साखळी बॉम्बस्फोटाचा खटला विशेष न्यायालयात आठ वर्षे चालला. १३ आरोपींपैकी १२ आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले. त्यापैकी पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. कोरोना काळात एका आरोपीचा मृत्यू झाला. या सर्व आरोपींना शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तर राज्य सरकारने पाच जणांच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केले आहेत. यावरील सुनावणी ५ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे.