मुंबई : सांडपाण्यावर प्रक्रिया करून बागेत वापरण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात येत असल्याने त्यांच्यापुढे आदर्श ठेवण्यासाठी राज भवनातील बागेवरही प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर होणार आहे. त्यामुळे दररोज दीड लाख लिटर पिण्याच्या पाण्याची बचत होणार आहे.राजभवनाच्या भव्य परीसरातील उद्यानांमध्ये पिण्याचा पाण्याचा वापर केला जात आहे. या उद्यानात वापरण्यात येणाऱ्या लाखो लिटर्स पाण्याची बचत करण्यासाठी बाणगंगा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया केलेले सांडपाणी देण्यात यावी, अशी मागणी १५ सप्टेंबर २०१५ मध्ये राजभवनाकडून पालिकेकडे करण्यात आली होती. परंतु गेली दोन वर्षे या पाण्याच्या दरावरुन प्रस्ताव रखडला होता. सुरुवातीला पालिकेने प्रत्येक हजार लिटरसाठी १४ रुपये आकारण्याचा प्रस्ताव राजभवनापुढे मांडला होता. मात्र पिण्याचे पाणी तीन ते चार रुपयांमध्ये मिळत असताना प्रक्रिया केलेले पाण्यासाठी १४ रुपये मोजण्यास राज भवन तयार नव्हते. अखेर महापालिकेने तीन रुपये २७ पैशांमध्ये राजभवनाला दररोज दीड लाख लिटर प्रक्रिया केलेले सांडपाणी पुरविण्याची तयारी दाखवली आहे. तसेच महालक्ष्मी रेसकोर्सवरही अशाप्रकारे प्रक्रिया केलेले पाणी पुरविण्यात येत आहे. या ठिकाणी पाणी पुरवठा करण्यासाठी पालिका प्रशासन १५० मिली मीटर व्यासाची ८३० मीटर लांबीची नवी जलवाहिनी टाकणार आहे. या कामासाठी ६७ लाख ९६ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे, त्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे आगामी बैठकीत मंजुरीसाठी सादर होणार आहे. (प्रतिनिधी)
सांडपाण्यावर फुलणार राजभवनाचे उद्यान
By admin | Published: April 18, 2017 5:18 AM