मुंबई : कोकणातील राजापूर रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधाची धार वाढली असून, शेकडो प्रकल्पग्रस्तांनी शुक्रवारी आक्रमक पवित्रा घेत सरकारविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन केले. दरम्यान, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि शिवसेना पक्षप्रमुख यांनी मांडलेल्या विरोधी भूमिकेमुळे या ठिकाणी उपस्थित शिवसेना नेत्यांची पुरती कोंडी झाल्याचे चित्र होते.कोकणातील या प्रकल्पास १०० टक्के विरोध असल्याचा दावा, प्रकल्पग्रस्तांच्या कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी केला. वालम म्हणाले की, शिवसेनेने आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रकल्पाला विरोध असल्याची भूमिका जाहीर केली आहे. मात्र, त्यानंतरही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडून वारंवार प्रकल्पग्रस्तांची समजूत काढत असल्याची प्रतिक्रिया देण्यात येत आहे. उद्योगमंत्री आणि पर्यावरणमंत्री शिवसेनेचेच असताना प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे खरेच शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचा प्रकल्पास विरोध असेल, तर त्यांनी देसार्इंना प्रकल्प रद्द केल्याची घोषणा करण्यास सांगावे, अन्यथा पक्षाचा राजीनामा देऊन प्रकल्पग्रस्तांसोबत लढ्यात उतरावे.दरम्यान, प्रकल्पग्रस्तांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आझाद मैदानावर धडकले. मात्र, प्रकल्पग्रस्त संघटनेच्या नेत्यांनी देसाई आणि ठाकरे यांच्या परस्परविरोधी भूमिकांवरून आंदोलनादरम्यान त्यांचा खरपूस समाचार घेतला. राऊत यांची झालेली कोंडी या वेळी स्पष्टपणे दिसत होतीे.सेनेचा रिफायनरी विरोध हा दुटप्पीपणा - सुनील तटकरेमुंबई : कोकणवासीयांनी रिफायनरी विरोधात छेडलेल्या आंदोलनामुळे शिवसेनेचा दुटप्पीपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. केंद्रातील आणि राज्यातील उद्योग खाते शिवसेनेकडे आहे. राज्यातील पर्यावरण खातेही शिवसेनेच्या मंत्र्याकडे आहेत. त्यांच्या परवानगीनेच प्रकल्प कोकणात येतोय. आता, स्थानिकांनी आंदोलन छेडल्यावर शिवसेनेचे आमदारच पांठिब्याचे नाटक करत आहेत. शिवसेनेच्या दुटप्पीपणाचा हा आणखी एक नमुना असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुक्रवारी केली.ओखी वादळाचा तडाखा, राष्ट्रवादीचे विदर्भातील हल्लाबोल आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत तटकरे बोलत होते. कोकणात रिफायनरी प्रकल्प आणण्याचा पुढाकार शिवसेनेचाच आहे. तरीही प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलनात शिवसेना सामील होऊन गावक-यांना फसवू पाहते आहे. कोकणातील जनतेला शिवसेनेचे ही नाटके कळाली आहेत. आम्ही सत्तेत असताना कोकणात एकही रासायनिक प्रकल्प येऊ दिला नव्हता. कोकणवासीयांसाठी शिवसेना अशी भूमिका घेईल असे वटात नाही, असा आरोपही तटकरे यांनी केला. तसेच नाना पटोलेंचा राजीनामा म्हणजे एककल्ली कारभाराचे उदाहरण असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
राजापूर रिफायनरी प्रकल्पग्रस्त आक्रमक, सुभाष देसार्इंविरोधात नाराजीचा सूर, शिवसेना नेत्यांची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 5:29 AM