‘जेठालाल’च्या भेटीसाठी राजस्थानमधील मुलांनी गाठली मुंबई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 05:53 AM2018-06-11T05:53:28+5:302018-06-11T05:53:28+5:30
तारक मेहता का उल्टा चष्मा यातील जेठालालला भेटण्यासाठी राजस्थानच्या दोन भावंडांनी चक्क मुंबई गाठली.
मुंबई - तारक मेहता का उल्टा चष्मा यातील जेठालालला भेटण्यासाठी राजस्थानच्या दोन भावंडांनी चक्क मुंबई गाठली. यासाठी चक्क मजुरी करून चार हजार रुपये कमवले होते; पण ते दोघे रविवारी पवई पोलिसांच्या हाती सापडले. मात्र, अभिनेत्यावरचे त्यांचे प्रेम बघून पोलीस आता या दोघांची भेट जेठालाल सोबत करून देणार आहेत.
राजस्थानच्या छानी भागात १३ वर्षांचा महेश आणि १४ वर्षांचा अजय (नावात बदल) कुटुंबीयांसोबत राहतात. महेश आठवीत, तर अजय नववी इयत्तेत शिक्षण घेत आहे. दोघांनाही तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका आवडते. त्यातील जेठालाल चंपक गडाची भूमिका बजाविणाऱ्या दिलीप जोशीचे ते फॅन्स आहेत. या जेठालालला भेटण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. सुरुवातीला आईवडिलांकडे या भेटीची इच्छा व्यक्त केली. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर दोघांनीच मुंबईत येण्याचे ठरविले. अशात घरातून खेळायला जातो, असे सांगून त्यांनी मजुरीच्या कामाला सुरुवात केली. त्यातून त्यांनी चार हजार १०० रुपयांची कमाई केली. पैसे हाती लागताच, शनिवारी सकाळी घरी काहीही न सांगता ते बाहेर पडले. त्यांनी थेट मुंबईसाठी गाडी पकडली. पवई परिसरात बसने प्रवास करत असताना, त्यांनी गोरेगाव फिल्मसिटीबाबत विचारणा केली. मात्र, ती बस गोरेगावला जात नसल्याचे समजताच ते खाली उतरले. मात्र, दोघेही मुले रस्ता भरकटल्याचा संशय तेथील प्रवाशाला आला. त्याने मुलांना घेऊन थेट पवई पोलीस ठाणे गाठले.
सकाळी पीएसआय रावसाहेब मोटे आणि रीना लोहार यांनी दोन्ही मुलांकडे चौकशी सुरू केली. तेव्हा त्यांच्या चौकशीत वरील घटनाक्रम उघडकीस आला. त्यांनी तत्काळ राजस्थान पोलिसांशी संपर्क साधला. सांयकाळी त्यांच्या पालकांपर्यंत राजस्थान पोलीस पोहोचले आणि मुले सुखरूप असल्याचे समजताच कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ते मुंबईकडे येण्यास निघाले आहेत. सोमवारी ते मुंबईत दाखल होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस घडवणार जेठालालशी भेट
जेठालाल सोबत भेट घडवून देण्यासाठी पवई पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहे. त्यांनी संबंधितांशी संपर्क साधला आहे. पालक मुंबईत आल्यानंतर ते जेठालाल सोबत या मुलांची भेट घालून देणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.