ठाण्यात आजपासून रंगणार राजस्थान महोत्सव
By admin | Published: January 2, 2015 10:49 PM2015-01-02T22:49:25+5:302015-01-02T22:49:25+5:30
पारंपरिक, डिझायनर राजस्थानी पोशाख, दागिने, खाद्यपदार्थ आणि लोककला अशा विविध प्रकारांतून राजस्थानी संस्कृतीचे दर्शन घडविणारा राजस्थान महोत्सव ३ आणि ४ जानेवारीला ठाण्यात रंगणार आहे.
संस्कृतीचे घडणार दर्शन : लोकमतचे एडिटर इन चीफ
राजेंद्र दर्डा यांच्यासह अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती
ठाणे : पारंपरिक, डिझायनर राजस्थानी पोशाख, दागिने, खाद्यपदार्थ आणि लोककला अशा विविध प्रकारांतून राजस्थानी संस्कृतीचे दर्शन घडविणारा राजस्थान महोत्सव ३ आणि ४ जानेवारीला ठाण्यात रंगणार आहे. ‘मारवाडीज इन ठाणे वेल्फेअर’ आणि ‘सुप्रयास फाउंडेशन’ आयोजित महोत्सवाला विशेष अतिथी म्हणून माजी मंत्री तथा लोकमतचे एडिटर इन चीफ मंत्री राजेंद्र दर्डा उपस्थित राहणार असून उद्घाटन उद्योजक दिनेश अग्रवाल यांच्या हस्ते होणार आहे.
यंदाचे महोत्सवाचे चौथे वर्ष असून उद्घाटन ३ जानेवारीला शिवाजी मैदानात सायंकाळी ६ वाजता होणार आहे. या वेळी आमदार गोपालदास अग्रवाल, राज पुरोहित, संजय केळकर, अॅड. निरंजन डावखरे, ठाणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव मनोज शिंदे, जैन मानव सेवा केंद्र दहिसरचे व्यवस्थापक डॉ. नेमजी गांगर, ओसवाल यूथ फाउंडेशन मुंबईचे अध्यक्ष किशोर खाबिया, डी.एस. मित्तल अॅण्ड सन्सचे संचालक बृजबिहारी मित्तल आणि लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन अनिल जाधव यांची प्रमुख उपस्थिती असेल. त्यानंतर, गायक आणि संगीतकार सतीश देहरा आणि ग्रुप मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करणार आहे.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी विशेष अतिथी म्हणून नेत्रतज्ज्ञ डॉ. श्याम अग्रवाल आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस गणेश पाटील विशेष उपस्थित राहणार आहेत. आमदार नरेंद्र मेहता, ठाण्याच्या जिल्हाधिकारी अश्विनी जोशी, पोलीस आयुक्त विजय कांबळे, माजी खासदार संजीव नाईक, परोपकार संस्थेचे ट्रस्टी शंकरलाल केजरीवाल, क्रिएटिव्ह ग्रुप आॅफ कंपनीजचे संचालक कैलास अग्रवाल, सिनेकलाकार कुणिका सदानंद, दयाशंकर पांडे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. महोत्सवात दरवर्षीप्रमाणे यंदाही उद्योग, कला, संस्कृती, शिक्षण, साहित्य आणि आरोग्य या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एका राजस्थानी व्यक्तीला ‘मारवाडरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या वेळी होणाऱ्या कवी संमेलनात हास्यकवी सुरेंद्र शर्मा यांच्यासह गौरव शर्मा आणि प्रकाश पपलू हे सहभागी होणार आहेत. या महोत्सवाला जास्तीतजास्त ठाणेकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा सुमन अग्रवाल यांनी केले आहे. (प्रतिनिधी)