लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जडीबुटीचा व्यवसाय करणाऱ्यांंकडून खंडणी उकळणाऱ्या राजस्थानी टोळीचा पर्दाफाश करत गुन्हे शाखेने पाचजणांना अटक केली. यातील एका आरोपीविरुद्ध ४२ गुन्हे नोंद आहेत.
गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, जडीबुटीच्या व्यवसायात चांगला नफा मिळविणाऱ्या एका व्यावसायिकाला धमकावून या टोळीने नऊ लाखांची मागणी केली. भीतीने व्यावसायिकाने त्यांना सहा लाख ४० हजार रुपये दिले होते. पुढे ७ फेब्रुवारी रोजी त्यांनी वांद्रे पोलिसांकडे तक्रार दिली. त्यावरून गुन्हा नोंद करत पोलिसांनी तपास केला. अशात, ही टोळी दहिसर भागात पैशांच्या वाटणीसाठी येणार असल्याची माहिती मिळताच, गुन्हे शाखेच्या कक्ष ३ ने त्यांना सापळा रचून अटक केली. त्यांच्या चौकशीतून यातील एका आरोपीविरुद्ध ४२ गुन्हे नोंद असल्याचे, तर अन्य आरोपींविरुद्ध प्रत्येकी दोन गुन्ह्यांची नोंद आहे.
ही टोळी जडीबुटीच्या व्यवसाय करणारे तसेच यातून चांगला नफा कमाविणाऱ्या वैद्यांची माहिती गोळा करायचे. नंतर त्यांच्याकडे रुग्ण म्हणून जात खंडणी उकळत असल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करत आहेत.