लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयातील आयसीयूमध्ये असलेल्या एका युवकाचा डोळा उंदराने कुरतडल्याचे प्रकरण समोर आले आहे. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील ही पहिलीच घटना नाही. याआधीही कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात एका महिला रुग्णाचा पाय, तर दुसऱ्या महिलेचा डोळा उंदराने कुरतडला हाेता.
श्रीनिवास यल्लपा या २४ वर्षीय रुग्णाला दोन दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात दम लागत असल्याने दाखल केले होते. त्याला मेंदूज्वर आणि यकृतासंबंधी समस्या हाेती. मंगळवारी सकाळी त्याच्या नातेवाइकांना रुग्णाच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचे दिसले. त्यांनी डोळे तपासले असता डोळ्याला उंदराने कुरतडल्याचे समोर आले. याबाबत त्यांनी रुग्णालयातील परिचारिकांना सांगितले. मात्र, त्यांनी उद्धट उत्तरे दिल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. आयसीयू तळमजल्यावर असल्याने येथे उंदरांचा वावर आहे. प्रथमदर्शनी उंदराने चावा घेतल्याचे दिसत असून याबाबत सुरक्षेचे उपाय करीत असल्याचे राजावाडी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. विद्या ठाकूर यांनी सांगितले.
* कांदिवली शताब्दी रुग्णालयातही घडला होता प्रकार
कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात ८ ऑक्टोबरला २०१७ रोजी उपचारासाठी दाखल शांताबेन जाधव या महिलेचा पाय उंदराने कुरतडला हाेता. ही महिला झोपेत असल्याने याबाबत तिला काहीच कळले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
- प्रमिला नेरुळकर या रुग्णाचाही डोळा उंदराने कुरतडला होता. या घटनेनंतर महिलेला इंजेक्शन द्यायला हवे होते. मात्र, असे न करता रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरून इंजेक्शन आणायला सांगितले. रुग्णाच्या नातेवाइकाला डॉक्टारांनी १० रुपयात आणखी काय उपचार करणार, असेही सुनावले होते. हा प्रकार स्थानिक आमदार मनीषा चौधरी यांनी निदर्शनास आणून चौकशीची मागणी केली होती.