राजधानी एक्स्प्रेस आठवड्यातून पाच वेळा धावेल - रेल्वेमंत्री गोयल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 01:05 AM2019-09-14T01:05:02+5:302019-09-14T01:05:22+5:30
मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे फलाट क्रमांक १८ वर उभ्या असलेल्या दुसऱ्या राजधानी एक्स्प्रेसला रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी हिरवा झेंडा दाखविला.
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरून जानेवारीत सर्वात पहिली मुंबई ते दिल्ली राजधानी एक्स्पे्रस धावली. ही गाडी आठवड्यातून दोनदा धावत होती. या गाडीला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने आठ महिन्यांत आठवड्यातून चार वेळा ती चालविण्याचे ध्येय पूर्ण करण्यात आले. आता पुढील काही दिवसांत आठवड्यातून पाच वेळा राजधानी एक्स्प्रेस धावेल, असा आशावाद केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केला.
मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे फलाट क्रमांक १८ वर उभ्या असलेल्या दुसऱ्या राजधानी एक्स्प्रेसला रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी हिरवा झेंडा दाखविला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) ते हजरत निझामुद्दीन (दिल्ली) राजधानी आठवड्यातील सोमवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार या दिवशी मुंबईहून सायंकाळी ४ वाजून १० मिनिटांनी सुटेल. तिला कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भोपाळ, झाशी, आग्रा या स्थानकावर थांबा दिला जाईल. मुंबई ते दिल्ली आणि दिल्ली ते हावडा एक्स्प्रेसचा वेग ताशी १३० प्रति किमीवरून ताशी १६० प्रति किमी करण्यात येईल. या प्रकल्पाला मंत्रिमंडळातून मंजुरी मिळाल्याचेही गोयल म्हणाले.