Join us

राजेंद्र दर्डा यांच्या 'माझी भिंत' पुस्तकाचे आज राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2020 9:17 AM

Rajendra Darda : प्रदीर्घ राजकीय कारकीर्द आणि सामाजिक जीवन लाभलेले दर्डा यांनी आपल्या समृद्ध अनुभवविश्वाची दारं या पुस्तकाच्या निमित्ताने उघडली आहेत.

ठळक मुद्देकोरोनामुळे हा कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी असला, तरी १० नोव्हेंबर रोजी या कार्यक्रमाचे फेसबुक आणि यूट्युबवरून प्रसारण होणार आहे.

मुंबई : 'लोकमत' समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी त्यांच्या 'फेसबुक'वरील भिंतीचं अंतरंग उलगडून दाखवणारे 'माझी भिंत' हे अनोखे पुस्तक लिहिले असून या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी दिनांक ९ नोव्हेंबर रोजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनात होणार आहे.

प्रदीर्घ राजकीय कारकीर्द आणि सामाजिक जीवन लाभलेले दर्डा यांनी आपल्या समृद्ध अनुभवविश्वाची दारं या पुस्तकाच्या निमित्ताने उघडली आहेत. वर्तमान कितीही गुंतागंतीचं आणि जिकिरीचं असलं, तरी येणारा दिवस आपलाच आहे, असा दिलासा देणाऱ्या अनेक गुजगोष्टी 'माझी भिंत' या पुस्तकात सामावलेल्या आहेत. वेगाने विषारी होत चाललेल्या समाजमाध्यमांचा कट्टा शुभंकर विचारांच्या प्रसारासाठी किती सकारात्मकतेने वापरता येतो, याची प्रचिती या अनोख्या पुस्तकात मिळते. फेसबुकच्या भिंतीवर केवळ द्वेष आणि भांडणं नव्हे तर प्रेम आणि स्नेहही फुलवता येतो, याचा अनुभव देणारं हे संकलन; हा मराठीतल्या या स्वरुपाचा पहिलाच प्रयोग आहे. राजेंद्र दर्डा यांनी त्यांच्या अनुभवातून एक वेगळे विश्व यानिमित्ताने पुस्तकरुपाने समोर आणले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ होणार आहे. लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होत आहे. या पुस्तकाला प्रख्यात अभिनेता रितेश देशमुख यांनी प्रस्तावना लिहिली आहे.

कोरोनामुळे हा कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी असला, तरी १० नोव्हेंबर रोजी या कार्यक्रमाचे फेसबुक आणि यूट्युबवरून प्रसारण होणार आहे.

 

टॅग्स :राजेंद्र दर्डाविजय दर्डाजयंत पाटीलबाळासाहेब थोरातअशोक चव्हाणभगत सिंह कोश्यारी