Join us

वर्सोव्याचे राजेश शेट्ये ३० वर्षे करतात रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2021 4:08 AM

मनोहर कुंभेजकरलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सध्या कोविडमुळे सर्वत्र रक्ताची टंचाई जाणवत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला ...

मनोहर कुंभेजकर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सध्या कोविडमुळे सर्वत्र रक्ताची टंचाई जाणवत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक सेवाभावी संस्था आणि राजकीय पक्ष रक्तदान शिबिरे घेण्यासाठी पुढाकार घेत आहेत. वर्सोवा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उपविभागप्रमुख राजेश शेट्ये यांना तर प्रत्येक वर्षी किमान दोनवेळा तरी रक्तदान करायचा छंदच आहे. गेल्या ३० वर्षांत त्यांनी रक्तदानाची शंभरी पार केली असून कोविड काळात त्यांनी तीनवेळा रक्तदान केले आहे.

महाराष्ट्र राज्यात रुग्णांसाठी दरवर्षी सुमारे साडेसात लाख बाटल्या रक्त लागते. ही गरज ७० ते ७५ टक्के पर्यायी बदली रक्तदाता किंवा व्यावसायिक रक्तदात्याकडून भागविली जाते. मानवाच्या शरीरामधे साडेचार ते पाच लिटर रक्त असते. रक्तदानाच्या वेळी केवळ ३०० मिली. रक्त काढले जाते. प्रत्येक रक्तदानानंतर साधारण ३६ तासांमध्ये शरीरात रक्ताची पातळी पूर्ववत होते. तसेच साधारण २ ते ३ आठवड्यांमधे रक्तपेशीही पूर्ववत होतात, अशी माहिती त्यांनी दिली.

रक्तदान केल्याने कोणताही त्रास किंवा इजा होत नाही. तसेच रक्तगट व हिमोग्लोबिनच्या प्रमाणाबाबत माहिती मिळते. बोन मॅरोमध्ये नवीन रक्त तयार करण्याची कार्यक्षमता वाढते, तर नवीन तयार झालेल्या रक्तपेशी व रक्तरस यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढून शरीरात चैतन्य निर्माण होते, असे ते म्हणाले.

नियमित रक्तदान केल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त वाढत नाही. त्यामुळे हृदय-यकृतासारखे अवयव निरोगी राहतात. शिवाय शरीरालाही नवीन रक्त तयार करण्याची सवय जडते. रक्तदानाचे फायदे बघितले तर नक्कीच समाजाचे ऋण फेडायची संधी रक्तदाबामुळे मिळते व काहीअंशी स्वत:च्या फायद्यासाठी का हाेईना, पण प्रत्येकाने रक्तदान करावे, असे मत राजेश शेट्ये यांनी व्यक्त केले.

--- -------------------------------- ---