Rajesh Tope : भरती परीक्षेचा गोंधळ... आरोग्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करावी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 05:22 PM2021-10-17T17:22:35+5:302021-10-17T17:24:23+5:30
Rajesh Tope : आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेत दुसऱ्यांदा झालेल्या गोंधळावरून आमदार अतुल भातखळकर यांचे टीकास्त्र
मुंबई - आरोग्य विभागाच्या परीक्षा गेल्या सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या ऐनवेळी रद्द करून साडेआठ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थांना वेठीस धरण्याच्या महापापाची पुनरावृत्ती करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले आहे. येत्या दि, २४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या परीक्षार्थींना एकाच दिवशी होणाऱ्या दोन पेपरसाठी सकाळी एका वेगळ्या जिल्ह्यात आणि दुपारी आणखी वेगळ्या जिल्ह्यात केंद्र देण्याचा ‘महा-पराक्रम’ केला आहे, या परीक्षार्थींनी ही परीक्षा कशी द्यायची असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे आरोग्यमंत्रीराजेश टोपे यांनी या परीक्षार्थींना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी आता हेलिकॉप्टरची सुद्धा व्यवस्था कराच अशी टीका भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
अर्थपूर्ण संवाद करत बोगस कंपनीला कामे द्यायची आणि त्यातून गोंधळ निर्माण करायचा हाच महाविकास आघाडी सरकारचा ‘भ्रष्टाचारी पॅटर्न’ बनला असल्याचे वारंवार समोर येत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या भरतीचा गोंधळ अद्यापही मिटलेला नाही. एकदा ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्यानं राज्यातील लाखो परीक्षार्थींनी आक्रोश केला. मात्र, आता दुसऱ्यांदा परीक्षा घेताना देखील या तरुणांना मनस्तापच सहन करायला लागत असल्याचं दिसत आहे. अनेक परीक्षार्थींना अर्ज करताना जे केंद्र मागितलं ते मिळालंच नाही. तर याहीवेळी अनेक परिक्षार्थीचे प्रवेशपत्रावर फोटो, केंद्र आणि वेळ सुद्धा नाही त्यामुळे नक्की परीक्षा कशी द्यायची असे प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा एकदा निर्माण झाले आहेत.
दरम्यान, आता या विषयांत स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालावे, शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून या परीक्षा घेण्यात याव्या व आपल्या निष्क्रियतेमुळे लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा वेठीस धरण्याचे काम करणाऱ्या व केवळ खोट्या वल्गना करण्यात धन्यता मानणाऱ्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची तात्काळ मंत्री पदावरून हकालपट्टी करावी अशी आग्रही मागणी सुद्धा आमदार भातखळकर यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.