Rajesh Tope : 'लसीकरणासाठी 7.5 हजार कोटींचा खर्च, मोफतबाबात कॅबिनेटमध्ये होईल निर्णय'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 01:15 PM2021-04-27T13:15:11+5:302021-04-27T13:15:42+5:30
देशात 1 मे पासून लशीच नसतील तर लसीकरण सुरु कसं होणार हा सर्वच राज्यांपुढचा प्रश्न आहे. राज्यात या क्षणाला दीड कोटींहून अधिक नागरिकांचं लसीकरण पूर्ण झाल्याचं समाधान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलंय.
मुंबई - देशात लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना सरसकट लसीकरण चालू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर लसीकरण मोफत असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले होते. पण, सध्यातरी असा कुठलाही निर्णय झाला नाही. महाविकासआघाडी एकत्र बैठकीत मोफत लसीकरणाबाबत निर्णय घेणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. तर, दुसरीकडे आरोग्यमंत्रीराजेश टोपे यांनीही मोफत लसीकरणाचा निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केलंय.
देशात 1 मे पासून लशीच नसतील तर लसीकरण सुरु कसं होणार हा सर्वच राज्यांपुढचा प्रश्न आहे. राज्यात या क्षणाला दीड कोटींहून अधिक नागरिकांचं लसीकरण पूर्ण झाल्याचं समाधान आरोग्यमंत्रीराजेश टोपे यांनी व्यक्त केलंय. तसेच, नव्या टप्प्यातील लसीकरणासाठी साडेसात हजार कोटींचा खर्च. लस सर्वांनाच मोफत द्यायची की आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोफत लस द्यायची याचा निर्णय कॅबिनेटमध्ये होईल. अद्याप यासंदर्भातील निर्णय झाला नसल्याचे टोपे यांनी सांगितले. तसेच, लसीची उपलब्धता हे मात्र मोठं आव्हान, असल्याचेही ते म्हणाले.
मलिक यांनी केली होती घोषणा
केंद्र सरकारने 1 मे पासून देशभरात 18 वर्षावरील लोकांना लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे 45 च्या खालील लोकांना केंद्रसरकार लस पुरवठा करणार नाही हे स्पष्ट दिसत आहे. दरम्यान, कोविडशील्ड लसीचे दर केंद्रासाठी दीडशे रुपये, राज्याला 400 रुपये आणि खासगींना 600 रुपये असणार आहेत. कोवॅक्सीनची किंमतसुध्दा 600 रुपये राज्यांना व 1200 रुपये खासगींना जाहीर झाली आहे. मागच्या कॅबिनेटमध्ये या दराबाबत चर्चा झाली. त्यामध्ये एकमत होत राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यास होकार दिला होता, असे नवाब मलिक यांनी जाहीर केलं होतं.
3 ते 4 महिन्यांचा कालावधी लागेल - जयंत पाटील
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लसी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणे गरजेचे आहे. सर्वांना लस मिळण्यासाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. अडचणी न येता सर्वांना लस सहज मिळण्यासाठी सरकारचे प्रयत्न राहतील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे.