Rajesh Tope: महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण असताना लसीकरणात दुजाभाव का?; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा केंद्राला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 01:43 PM2021-04-08T13:43:47+5:302021-04-08T13:54:59+5:30
Rajesh Tope on vaccination in Maharashtra less supply from center demand to give 40 lakhs doses in week: राज्यात कोरोना लसीचे डोस उपलब्ध नसल्यानं अनेक लसीकरण केंद्र बंद करावी होत असल्याच्या मुद्द्यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन लसीच्या पुरवठ्या संदर्भातील वस्तुस्थिती माध्यमांसमोर मांडली आहे.
Rajesh Tope On Corona Vaccination: राज्यात कोरोना लसीचे डोस उपलब्ध नसल्यानं अनेक लसीकरण केंद्र बंद करावी होत असल्याच्या मुद्द्यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन लसीच्या पुरवठ्या संदर्भातील वस्तुस्थिती माध्यमांसमोर मांडली आहे. राजेश टोपे यांनी यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे लसीच्या अपुऱ्या पुरवठ्याबाबत तक्रार केली असून त्यांनी यांसदर्भात तातडीनं योग्य ते निर्देश देण्याचं आश्वासन दिल्याची माहिती यावेळी दिली. टोपे यांनी यावेळी काही महत्वाचे सवाल उपस्थित केले. Rajesh Tope on vaccination in Maharashtra less supply from center demand to give 40 lakhs doses in week
"देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण असतानाही लसीच्या पुरवठ्याबाबत दुजाभाव का कशासाठी? राज्यात आज केवळ साडेसात लाख लसीचे डोस पुरवण्यात आले. पण इतर राज्यांना ४० लाखांहून अधिक डोस देण्यात आले आहेत. याबाबत माझं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी फोनवर बोलणं झालं आहे आणि त्यांनी तुमचा फोन ठेवताच संबंधिक अधिकाऱ्यांशी बोलून याबाबत योग्य ते निर्णय घेण्याचे निर्देश देतो", असं सांगितल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
आठवड्याला ४० लाख डोस द्या
"केंद्र सरकार राज्याला लसीच्या पुरवठ्यासंदर्भात मदत करत आहे. यात राजकारणाचा मुद्दा नाही. पण ज्यापद्धतीनं पुरवठा केला जात आहे ते योग्य नाही. दर आठवड्याला आम्हाला ४० लाख डोसेस द्या त्यापेक्षा अधिक आमची काहीच मागणी नाही", असं राजेश टोपे यावेळी म्हणाले.
गुजरात आणि महाराष्ट्राची केली तुलना
राजेश टोपे यांनी यावेळी गुजरात आणि महाराष्ट्राला पुरवल्या जाणाऱ्या लसीच्या पुरवठ्याची तुलना करुन महाराष्ट्रासोबत केला जाणारा दुजाभाव दाखवून दिला आहे. "गुजरातपेक्षा महाराष्ट्राची लोकसंख्या दुप्पट आहे. महाराष्ट्रात आज साडेचार लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. तर गुजरातमध्ये आजच्या घडीला फक्त १७ हजार सक्रिय रुग्ण आहेत. पण महाराष्ट्रापेक्षा गुजरातला लसीचा पुरवठा अधिक केला जात आहे. केंद आणि राज्यात समन्वय आहे. वादविवादाचा विषय नाही. पण गरजेनुसार पुरवठा व्हायला हवा आणि ही अतिशय रास्त मागणी आहे", असं राजेश टोपे म्हणाले.
वयवर्ष १८ वर्षावरील सर्वांना लस द्या
"अमेरिकेसारख्या विकसित देशांनी १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आपणही याची सुरुवात करायला हवी कारण हाच वयोगट सर्वाधिक बाहेर फिरणारा आहे. इतर देशांना लस पुरवली पाहिजे पण सध्या आपल्या देशाला सर्वाधिक गरज आहे. तर याची काळजी घेऊन १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याची घोषणा केंद्रानं करायला हवी", अशी मागणी राजेश टोपे यांनी यावेळी केली.