राजेश्वर उदानी हत्या प्रकरण: पवारने पाठविलेल्या ‘त्या’ संदेशाचा अर्थ कळला असता, तर उदानी वाचले असते!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 05:14 AM2018-12-10T05:14:32+5:302018-12-10T05:14:52+5:30
सचिन पवारने धाडला ‘आय विल क्लोज दिस मॅटर’ असा मॅसेज
मुंबई : घाटकोपरमधील व्यावसायिक राजेश्वर उदानी यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचा माजी सचिव सचिन पवारला १४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. आर्थिक देवाण-घेवाणीच्या वादातून दोघांमध्ये खटके उडत होते. सचिनने त्यांना अखेरचा ‘आय विल क्लोज दिस मॅटर’चा संदेश धाडला होता. त्यांना वेळीच या संदेशचा अर्थ समजला असता, तर ते वाचले असते, अशीही माहिती समोर येत आहे. या प्रकरणी पंतनगर पोलिसांनी अभिनेत्री देबोलीना भट्टाचार्याचा जबाब नोंदवून सोडून दिले आहे.
रविवारी पवारला भोईवाडा न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी या प्रकरणातील निलंबित पोलीस दिनेश पवारला न्यायालयात हजर करण्यात आले नव्हते. सचिनने हत्येदरम्यान कारचा वापर केला होता. यामध्ये त्याने बनावट वाहन क्रमांकाचा आधार घेतला होता. त्याने ज्याच्याकडून वाहन क्रमांक बनवून घेतला, त्याचाही जबाब शनिवारी नोंदविण्यात आला आहे. सचिनने आणखीन ४ ते ५ जणांच्या मदतीने उदानी यांच्या हत्येचा कट आखला. या दरम्यान तो अनेकांच्या संपर्कात होता, तर व्हॉट्सअॅप दरम्यान तो अभिनेत्री भट्टाचार्याच्याही संपर्कात असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. त्याच्या चौकशीतून अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
आरोपींचे वकील समाधान सुलाने यांनी, उदानी यांच्या हत्येच्या काळात सचिन घरी होता. त्याच्यात आणि उदानीमध्ये मैत्रीपूर्ण संबंध होते. पोलिसांकडून हत्येबाबत खोटी माहिती रचण्यात येत आहे. भट्टाचार्याचाही यात काहीही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.
याच दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीत, सचिनची इव्हेंट कंपनी आहे. त्याच्या कंपनीला उदानी यांच्या मुलीचे व्हिडीओ शूटिंगचे काम मिळाले होते. मात्र, उदानीने त्याचे पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली, तसेच सचिन यानेही उदानी यांच्याकडून काही पैसे घेतले होते. उदानीकडून त्याला पैसे परत करण्यासाठी तगादा सुरू होता. आर्थिक देवाण-घेवाणीच्या वादातून दोघांमध्ये खटके उडायला लागले.
त्यातूनच सचिनने सुरुवातीला त्याला अडकविण्याचे ठरविले. त्याने बारबालांच्या मदतीने उदानी यांना हनीट्रॅपमध्ये अडकवून ब्लॅकमेल करून पैसे काढायचे ठरविले. ठरल्याप्रमाणे २८ तारखेला उदानी त्यांच्या कारमधून विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्गाच्या दिशेने निघाले. तेथे गाडी थांबवून चालक निसारला खाली उरविले.
त्याच दरम्यान त्यांना व्हॉट्सअप कॉल आला आणि ते तेथे आलेल्या दुसऱ्या गाडीत बसले. त्यात बारबालासह दिनेश पवार होता. दोघांचा सेक्सचा व्हिडीओ करायचा, नंतर याच व्हिडीओच्या आधारे त्यांना ब्लॅकमेल करायचे. मात्र, तो प्रयत्न फसल्याने त्याने उदानीचा काटा काढल्याची माहिती समोर येत आहे. याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
‘त्या’ संदेशामुळे जाळ्यात...
हत्याकांडादरम्यान सचिनने रागाच्या भरात ‘आय विल क्लोज दिस मॅटर’चा अखेरचा संदेश उदानी यांना धाडला.
मात्र या संदेशाकडे उदानी यांनी दुर्लक्ष केले. आणि ते सचिनच्या जाळ्यात अडकले. मात्र याच संदेशामुळे पोलीस त्याच्यापर्यंत पोहचले. अन्यथा तो पोलिसांना गुंगारा देत राहिला असता.
पोलिसांवर दबावाचे नाटक
२८ नोव्हेंबरला उदानी बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी पंतनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. तेव्हा, सचिन त्यांच्या नातेवाईकांसोबत पोलीस ठाण्यात आला होता. उदानी यांच्या शोधासाठी तो गुन्हे शाखेच्या अधिकाºयांवर दबाब टाकण्याचे नाटक करत असल्याचेही एका अधिकाºयाने सांगितले.
पोलिसांनी उदानी यांचा कॉल रेकॉर्ड काढला. तेव्हा, अखेरच्या दिवशी सचिनचे १३ कॉल त्यांच्या मोबाईलवर होते. ही माहिती समजताच, सचिनने भट्टाचार्यासोबत गुवाहाटी गाठली. तेथून परतताच दोघांना ताब्यात घेतले.
या दिशेनेही तपास...
पैशांच्या देवाण घेवाणीबरोबरच पवार उदानी भट्टाचार्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. तो तिला संदेशही धाडायचा. अशा अभिनेत्री पैशांसाठी कुणासोबतही शारीरिक संबंध ठेवतात, असेही उदानी यांनी म्हटले होते. याचाच राग आल्याने सचिनने त्यांचा काटा काढला का? शिवाय उदानी यांच्या हत्येनंतर आणखीन कुणाला फायदा होणार होता का? या दिशेनेही तपास सुरू असल्याची माहिती पंतनगर पोलिसांनी दिली.