मुंबई - राजीव कोचर यांना इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावरून गुरुवारी ताब्यात घेतले. ते दक्षिण-पूर्व आशियातील देशात जाण्याच्या बेतात होते. त्यांना सीबीआयच्या स्वाधीन करण्यात आले असून, व्हिडिओकॉन ग्रुपसोबतच्या बँकिंग व्यवहारप्रकरणी सीबीआय त्यांची चौकशी करीत आहे. राजीव कोचर हे आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांचे दीर आहेत.सीबीआयने राजीव कोचर यांच्याविरुद्ध अगोदरच लूक-आऊट नोटीस जारी केली होती. व्हिडिओकॉन ग्रुपला ३,२५० कोटींचे कर्ज दिल्याच्या मोबदल्यात काही लाभ देण्यात आला काय? याप्रकरणी सीबीआयने आयसीआयसीआय बँकेच्या काही अधिकाºयांची प्राथमिक चौकशी केली आहे.राजीव कोचर यांच्या सिंगापूरस्थित अविस्ता अॅडव्हायजरी या कंपनीने मागील सहा वर्षांत सात कंपन्यांच्या १.५ अब्ज डॉलरच्या कर्जाची फेररचना करून दिली, असे सीबीआयाच्या चौकशीतून उघड झाले आहे. कर्जाची फेररचना करून देण्यासाठी आयसीआयसीआय बँकेने अविस्ता अॅडव्हायजरी कंपनीला अधिकृत केले होते.तपास अधिकाºयांनी सांगितले की, ते या व्यवहारांसंदर्भातील कागदपत्रे तपासत आहेत. गरज पडल्यास आयसीआयसीआय बँकेच्या संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर व इतरांना चौकशीसाठी समन्स पाठवले जाईल. ३,२६० कोटी रुपयांचे कर्ज दिल्याच्या प्रकरणास जबाबदार असलेल्यांचे प्राथमिक जबाब सहा आठवड्यांपूर्वीच नोंदविण्यात आले आहेत.
राजीव कोचर यांना मुंबई विमानतळावरून घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 5:09 AM