मुंबई - हिंगोलीचेकाँग्रेस माजी खासदार राजीव सातव यांनी काँग्रेसने राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे, राजीव सातव महाविकास आघाडीकडून राज्यसभा निवडणूक लढवणार आहेत. यापूर्वी राष्ट्रवादीकडून पक्षाध्यक्ष शरद पवार आणि फौजिया खान यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. विशेष म्हणजे शरद पवारांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. त्यानंतर, काँग्रेसने एक उमेदवार दिला आहे.
राजीव सातव हे सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून निवडूण आलेले एकमेव खासदार होते. मात्र, सन 2019 च्या लोकसभा निवडणुकांवेळी त्यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर, काँग्रसने त्यांच्या गुजरात काँग्रेसची जबाबदारी दिली. सध्या, गुजरात काँग्रेसचे प्रभारी म्हणून ते कार्यरत आहेत. राज्यसभेसाठी सर्वच पक्षातील उमेदवारांची घोषणा होत आहे. काँग्रेसकडून एका जागेसाठी राजीव सातव यांचं नाव निश्चित झालं आहे. या जागेसाठी मुकूल वासनिक, रजनी पाटील, सुशीलकुमार शिंदे यासह अनेक नावं चर्चेत होती. मात्र, राजीव सातव यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले. सातव हे राहुल गांधींच्या विश्वासातील नेते आहेत.
दरम्यान, राजीव सातव हे सध्या ते गुजरातचे प्रभारी म्हणून काम पाहत आहेत. 2009 मध्ये ते कळमनुरी मतदारसंघातून आमदार, तर 2014 मधून हिंगोली मतदारसंघातून लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले होते. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकांवेळी त्यांनी उमेदवारी घेतली नव्हती. काँग्रेसमध्ये राहुल आणि प्रियंका गांधी या दोघांच्याही विश्वासू गोटात असलेले जे मोजके नेते आहेत त्यात राजीव सातव यांचा समावेश होतो. दरम्यान, महाविकास आघाडीचे 4 उमेदवार घोषित झाले असून शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.