राजकुमार हिरानींचा लघुपट करणार मतदार जागृती
By संजय घावरे | Published: January 27, 2024 08:46 PM2024-01-27T20:46:59+5:302024-01-27T20:47:13+5:30
निवडणूक आयोगासाठी बनवलेल्या लघुपटात अमिताभ-सचिनसह आघाडीचे कलावंत-खेळाडू.
मुंबई - निवडणूक आयोग आणि निर्माते-दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी एकत्र येऊन मतदार जागरूकतेवरील लघुपटाची निर्मिती केली आहे. यात दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासह काही सुप्रसिद्ध व्यक्ती सहभागी झाल्या आहेत.
नेहमीच सामाजिक जाणिवेचे भान राखत चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या राजकुमार हिरानी यांनी आजवर नेहमीच काही ना काही संदेश देणारे चित्रपट बनवले आहेत. 'मुन्नाभाई एमबीबीएस' चित्रपटापासून 'डंकी'पर्यंतच्या प्रवासात त्यांनी मानवी भाव-भावनांचे अचूक चित्रण करत जनमानसाच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. आता मतदारांच्या मनात मतदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी भारतीय निवडणूक आयोगासोबत एका लघुपटाची निर्मिती केली आहे. २५ जानेवारी म्हणजेच ‘राष्ट्रीय मतदार दिनी’ प्रदर्शित झालेल्या या लघुपटाचे नाव ‘माय व्होट, माय ड्युटी’ अर्थात ‘माझे मत, माझे कर्तव्य’ असे आहे. हा लघुपट ‘एका मताचे मूल्य’ या संकल्पनेवर आधारलेला आहे. या लघुपटात दिग्गज खेळाडू व कलावंत मंडळी सहभागी झाली आहेत. सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, राजकुमार राव, विकी कौशल, बोमन इराणी, आर. माधवन, रवीना टंडन, अर्शद वारसी, भूमी पेडणेकर आणि मोना सिंग यांचे संदेश यात समाविष्ट करण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक मताचे महत्त्व अधोरेखित करून मतदानाविषयी मतदारांमध्ये असलेली उदासीनता आणि बेपर्वाईसारखे वृत्तीविषयक अडथळे दूर करण्याचा या लघुपटाचा उद्देश आहे.
राजकुमार हिरानी निर्मित आणि संजीव किशनचंदानी दिग्दर्शित, हा लघुपट नागरिकांना त्यांच्या मतदानाचे महत्त्व लक्षात आणून देतो आणि त्यांना मतदानाला प्रेरित करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक मत परिणामकारक असल्याचे हा लघुपट अधोरेखित करतो.