Join us

माँसाहेब जिजाऊंचा स्मृतीदिन - स्वराज्य अन् छत्रपती शिवाजी घडविणाऱ्या विवेकी अन् कणखर राजमाता 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 9:51 AM

राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेड राजा जिल्हा बुलडाणा येथे झाला.

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या, आपल्या संस्कारातून शिवरायांच्या मनात सुराज्य स्थापनेचे बीज पेरणाऱ्या राजमाता जिजाऊंचा आज स्मृतीदिन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अफजलखान भेटीवेळी आपल्या मुलाला हिंमत बांधण्याचे काम माँसाहेब जिजाऊंनी केले. या भेटीत आपण कामी आलात, तर मी शंभूराजे यांचा सांभाळ करुन स्वराज्यची निर्मित्ती करेन, असा धाडसी बाणा दाखविणाऱ्या माँसाहेबांमुळेच छत्रपती शिवाजी महाराज जगातील आदर्श राजे बनले. आजही शिवरायांच्या कूटनितीचे दाखले देत किंवा त्यांचा दृष्टीकोन बाळगत अनेक कामे तडीस नेली जातात, महाराजांच्या प्रत्येक निर्णयामागे मोलाचे मार्गदर्शन असायचे ते माँसाहेब जिजाऊंचे. माँसाहेब जिजाऊंची आज 345 वी पुण्यतिथी आहे.  बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या त्यांच्या जन्मगावी 'जिजाऊ जन्मोत्सव' मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेड राजा जिल्हा बुलडाणा येथे झाला. त्यांच्या आईचे नाव म्हाळसाराणी आणि वडिलांचे नाव लखुजीराजे जाधव असे होते. जिजाऊंच्‍या प्राथमिक शिक्षणात युद्ध शिक्षण, राजनीती, भाषा, अनेक खेळ शिकविले गेले. जिजाऊंना मराठी, फार्सी, संस्कृत, कन्नड, तेलगू, उर्दू, हिंदी अशा बहुभाषा अवगत होत्या. त्यांचा विवाह 1610 मध्ये वेरूळ येथे शहाजीराजे भोसले यांच्याबरोबर झाला. जिजाबाईंना एकूण सहा अपत्ये होती, त्यामध्ये 6 मुली आणि दोन मुलांचा समावेश आहे. या दोन मुलांपैकी संभाजी हे शहाजी राजांजवळ वाढले तर शिवाजी हे माँसाहेब जिजाऊंच्या संस्कारात घडले.  जिजाऊ या ध्येयवादी मातेने पुण्या-सुप्याची जहागीर स्वतंत्र महाराष्ट्र राजमध्ये बदलण्याचे स्वप्न पाहिले. या स्वप्नाचा नायक- शिवबांना त्यादृष्टीने घडविले. आरोग्यसंपन्न, बहुश्रुत, चतुर, शिस्तप्रिय, कुशल, संघटक, प्रभावी व्वस्थापक, समताप्रेमी, स्वातंत्र्य व न्यायबुद्धी असलेला एक सर्वगुणसंपन्न महानायक. जिजाऊ विवेकी माता होत्या. त्यांची कार्यशैली जवळून बघणारे शिवबा त्या तालमीत घडत गेले. बारा मावळातील लोक गार्‍हाणी, तक्रारी, दु:ख घेऊन लालमहालात येत. मुजोरांची अरेरावी, लुबाडणूक, जमीन हडप, वतनाचे तंटे, बदअंमल, वर्षासनं, पूजाअर्चेचा हक्क, भाऊबंदकीचे वाद, खतं अवजारांची मागणी, कर-सारा, उभ्या पिकाची नासधूस, भगिनींवर अत्याचार अशी अनेक गार्‍हाणी ऐकली जात आणि न निवाडा केला जाई. अशाप्रकारे जिजाऊंनी शिवबांना राज-कारभाराचे धडे दिले.

स्त्रियांच्या कैवारी असलेल्या जिजाऊंनी स्त्रीचा सन्मान, आदर राखण्याची शिकवण शिवबांना दिली. रांझ्याच्या पाटलांनी एका स्त्रीवर अत्याचार केले तेव्हा त्याला मुसक्या बांधून आणण्याचे फर्मान सुटले. तो नराधम येताच शिवरायांनी ‘पाटलांचे हात-पाय कलम करा. यांचं वतन अमानत करा.’ अशी शिक्षा फर्मावली व ती ताबडतोब अमलात आणली. जिजाऊंनी शिवरायांना श्रद्धा व अंधश्रद्धेचे निकष, उचित-अनुचितच्या कसोटय़ा याची कास धरायला लावली.

‘लढाया केल्या अंधार्‍या राती। पाहिली नाही पंचांग पोथी।

ऐसी होती शिवनीती। जिजाऊपुत्राची।। शिवरा नव्हता दैववादी।

अमावस्येला मारिले गारदी।। भूत-भविष्य पाहिले ना कधी। लढाईवर जाताना।।’

जिजाऊंचे जीवन म्हणजे संस्काराचा खजिना. निरंतर टिकणारी मानवी मूल्यांची शिकवण. एक परिवर्तनवादी व्यक्तिमत्त्व. जिजाऊंनी शिवबांना रामायण-महाभारतातील गोष्टी सांगून मूल्य शिक्षणाचे धडे दिले ते नुसत कथनातून नव्हे तर स्वत:च वर्तनातून उभे केले. जिजाऊंचे स्मरण व अनुकरण करण्याच्या मानसिकतेच सुजाण आजच्या 21 व्या शतकातील मातांना हवं.जिजाऊंचे कर्तृत्व, नेतृत्व आणि मातृत्व तेही विवेकी असणार्‍या स्त्रियांच्या प्रतीक्षेत समाज आहे. आजही समाज शिवबाच्या प्रतिक्षेत आहे, पण तत्पूर्वी जिजाऊंसारखी कणखर, विवेकी माता असणं गरजेचं आहे. 

 

टॅग्स :छत्रपती शिवाजी महाराजजिजाऊ जन्मोस्तव