नवी दिल्ली-
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) यांनी रविवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याशी फोनवरुन संवाद साधला आणि उद्ध ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. उद्धव ठाकरेंवर मुंबईतील एच.एन.रिलायन्स रुग्णालयात मानेच्या दुखण्याबाबत सर्व्हायकल स्पाईनसंबंधी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. याच बाबतची माहिती आणि विचारपूस करण्यासाठी राजनाथ सिंह यांनी आज रश्मी ठाकरे यांच्याशी संपर्क केला. उद्धव ठाकरेंच्या तब्येतीत वेगानं सुधारणा व्हावी अशी प्राथर्ना यावेळी राजनाथ सिंह यांनी केली.
राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत आज मुंबईत डॉकयार्ड येथे आयएनएस विशाखापट्टणम नौदलाला सुपूर्द करण्यात आली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरेंचीही उपस्थिती असणार होती. पण त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानं ते सध्या त्यांना आरामाची गरज असल्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे ते आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. दरम्यान, कार्यक्रम झाल्यानंतर तातडीनं राजनाथ सिंह यांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना फोन करुन उद्धव ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस केली.
मान आणि पाठदुखीमुळे मुख्यमंत्री ठाकरे खूप त्रासले होते. त्यामुळे त्यांना अनेक कार्यक्रम देखील रद्द करावे लागत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आयोजित केलेल्या एका व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत उद्धव ठाकरे मानेला पट्टा लावून सहभागी झाले होते. त्यानंतर दुखणं आणखी वाढल्यानं त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या वर्षभरापासूनच उद्धव ठाकरे यांना मान आणि पाठदुखीचा त्रास होत होता अशी माहिती समोर आली आहे. १० नोव्हेंबर रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर १२ नोव्हेंबर रोजी त्यांच्या पाठीच्या कण्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा देखील होत होती. पण अचानक त्यांचं दुखणं पुन्हा बळावलं. सर्जरीनंतर कण्यात रक्ताच्या गुठळ्या झाल्याचं डॉक्टरांच्या निदर्शनास आलं. त्यामुळे डॉक्टरांना तातडीनं आणखी एक सर्जरी करावी लागली. उद्धव ठाकरे यांची प्रकृती आता उत्तम असून डॉक्टरांनी त्यांना काही दिवस आरामाचा सल्ला दिला आहे.